यवतमाळ : मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य शासनाने निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वात समिती नेमली आहे. या समितीने जिल्ह्यातील सर्वच कार्यालयांमधील जुन्या कागदपत्रांची पडताळणी करून ‘कुणबी’ नोंदीचा अहवाल मागविला आहे. त्यामुळे शासकीय कार्यालयात कर्मचारी दिवाळीच्या पर्वावर सुट्टीवर न जाता या दाखल्यांचा शोध घेण्यात दंग असल्याचे चित्र सर्वच शासकीय कार्यालयात बघायला मिळाले.

‘कुणबी’ इतिहास शोधण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशावरून सर्वच कार्यालयांतील कर्मचारी सध्या जुन्या फाईलींचे बाड घेऊन तपासणी करण्याच्या कामात गुंतले आहेत. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी ४ नोव्हेंबर रोजीच व्हीसी घेऊन सर्व विभाग प्रमुखांना याबाबत निर्देश दिले होते. त्यानुसार तहसील कार्यालय, भूमिअभिलेख कार्यालय, नगर परिषद कार्यालय, पंचायत समिती, शिक्षण विभाग आदी ठिकाणी जुन्या अभिलेखांची तपासणी युद्धपातळीवर केली जात आहे.

हेही वाचा – अमरावती : तुरीचे भाव ११ हजार ६०० रुपयांवर

सन १९४८ ते १९६७ या कालावधीचे हक्कनोंदणी, फेरफार, पेरेपत्रक, कोतवाल बुक नक्कल आदी तपासले जात आहेत. तसेच सर्व शाळांमधील जनरल रजिस्टर, कारागृहातील नोंदीही तपासल्या जात आहेत. उपनिबंधक कार्यालयातील नोंदीही तपासल्या जात आहेत. न्या. संदीप शिंदे यांची समिती लवकरच जिल्ह्यात दाखल होण्याचीही शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे सर्व कार्यालयातील कुणबी नोंदीचा अहवाल शुक्रवारपर्यंतच सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले होते. त्यामुळे शुक्रवारी पहाटेपासून कर्मचारी कार्यालयात ठाण मांडून कुणबी नोंदींचे उत्खनन करत होते. हे काम रात्री उशिरापर्यंत चालले. महसूल कर्मचारी दिवस-रात्र एक करून सेवा देत आहेत. जुन्या दस्तऐवजांचे गठ्ठे बाहेर काढण्यात आले आहेत.

हेही वाचा – अमरावती : खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारे बळकावली नोकरी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पुसदमध्ये ३८१ कुणबी नोंदी आढळल्या

पुसद तहसीलमध्ये तब्बल तीन लाख ९१ हजार ७४६ अभिलेखे तपासण्यात आलीत. त्यामध्ये ३२१ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. पंचायत समिती शिक्षण विभागात प्रवेश निर्गम नोंदवहीतील १३ हजार ६९८ नोंदी तपासल्यावर ६० कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. नगर परिषद कार्यालयातील ११ हजार ४१८ नोंदी तपासण्यात आल्या. तसेच येथील भूमिअभिलेख कार्यालयातील टिपण बुकातील ३ हजार २८३ नोंदी तपासण्यात आल्या. त्यामध्ये कुणबी जातीची नोंद आढळून आली नाही. पुसद तालुक्यात मागील तीन दिवसांत सर्व कार्यालयात तब्बल ४ लाख २० हजार १४५ कुणबी जातीच्या नोंदी तपासण्यात आल्या असून आतापर्यंत ३८१ कुणबी जातीच्या नोंदी आढळल्या. उपविभागीय अधिकारी एकनाथ काळबांडे, तहसीलदार महादेव जोरवर, नायब तहसीलदार गजानन कदम, रवि तुपसुंदरे व रशीद शेख, अव्वल कारकून जय राठोड आदींच्या पुढाकाराने ही मोहीम राबवली.