नागपूर: खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या “जागर भक्तीचा” या आध्यात्मिक उपक्रमांतर्गत गीता परिवार यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने आयोजित गीता पठण कार्यक्रमाने नागपूरच्या भूमीवर शनिवारी ऐतिहासिक विश्वविक्रम प्रस्थापित केला. ३०२ शाळांमधील ५ वी ते बारावीपर्यंतच्या ५२,५५९ विद्यार्थ्यांनी एकत्र येत भगवद्गीतेचे बाराव्या, पंधराव्या आणि सोळाव्या अध्याय एकाच सुरात पठण केले. हा सामूहिक पठण सोहळा वर्ल्‍ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडिया, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स या तीन संस्थांनी अधिकृतरीत्या नोंदवला.

नागपुरातील ईश्‍वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्‍या पटांगणावरील या उपक्रमाला गीता परिवारचे संस्‍थापक अध्‍यक्ष श्रीराम जन्‍मभूमी न्‍यासाचे कोषाध्‍यक्ष स्‍वामी गोविंददेव गिरी महाराज, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री व खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचे प्रणेते नितीन गडकरी, सामाजिक कार्यकर्त्‍या कांचनताई गडकरी, आमदार प्रवीण दटके, गीता परिवारचे राष्‍ट्रीय अध्‍यक्ष संजय मालपानी, आषुजी गोयल, समितीचे अध्‍यक्ष प्रा. अनिल सोले, रेणु अग्रवाल यांची उपस्थिती होती.

गीतेचे अर्थ, उच्चार आणि तत्त्वज्ञान विद्यार्थ्‍यांना शिकवणारे श्रीनिवास वर्णेकर व वंदना वर्णेकर यांचा नितीन गडकरी यांच्‍या हस्‍ते सत्‍कार करण्‍यात आला. वर्ल्‍ड रेकॉर्ड बुक ऑफ इंडियाचे संजय व सुषमा नार्वेकर, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड्स आणि एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स मनोज तत्‍ववादी यांची यावेळी उपस्‍थ‍िती होती. यावेळी मंचावर असलेल्‍या विद्यार्थ्‍यांनी गीता पठणाला सुरुवात केली. त्‍यांच्‍या सुरात पटांगणावर असलेल्‍या हजारो विद्यार्थ्‍यांनी सुर मिळसले. या सामूहिक पठणाने वातावरण भारावून गेले होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेणुका देशकर यांनी केले.

हा अभिमानाचा क्षण – नितीन गडकरी

गीता पठणाचा हा विश्‍वविक्रमाचा क्षण आनंद आणि अभिमानाचा आहे. भगवद्गीता जीवनाचे तत्‍वज्ञान आहे. लहान मुलांवर गीता पठणातून उत्‍तम संस्‍कार व्‍हावे, जीवन जगयाचा योग्‍य मार्गावर जाण्‍याची प्रेरणा मिळावी, हा उद्देश आहे. मागील वर्षी वंदेमातरम व मनाचे श्‍लोकचा विक्रम झाल्‍यानंतर या वर्षीचा हा ऐतिहास‍िक सोहळा खासदार सांस्‍कृतिक महोत्‍सव समितीचा उपक्रम सर्वांना प्रेरणा देईल, असे नितीन गडकरी म्हणाले.

भगवद्गीता जीवनाची मार्गदर्शिका – स्‍वामी गोविंददेव गिरी महाराज

देशाला जागे करायचे असेल तर प्रत्‍येक भागात गीता पठणासारखे उपक्रम राबवले पाहिजे. भगवद गीता ही जीवनाची मार्गदर्शिका असून प्रत्‍येकाने तिचा अवलंब केल्‍यास उत्‍तम, सफल, सार्थक आणि योग्‍य व्‍यक्‍ती घडतील. जगातील सर्व ग्रंथाचे सार या ग्रंथात आहे, असे स्‍वामी गोविंददेव गिरी महाराज म्हणाले.