नागपूर : विदर्भासह राज्यात विजेची मागणी वाढत असतानाच महानिर्मितीच्या कोराडी औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातील ६६० मेगावॉटचा एक संच तांत्रिक कारणाने बंद पडला आहे. तुर्तास राज्यात मागणीनुसार वीज पुरवठा होत आहे. परंतु मागणी अचानक वाढल्यास वीज पुरवठ्यावर परिणामाचा धोका आहे.

राज्याच्या बऱ्याच भागात उन्हाचा प्रकोप वाढत आहे. पंखे, वातानुकुलीत यंत्र, कृषीपंपांचा वापरही वाढत आहे. २३ मार्चच्या दुपारी १.२० वाजता राज्यात विजेची मागणी २६ हजार ५८८ मेगावॉट होती. त्यापैकी २१ हजार ९९५ मेगावॉट मागणी महावितरणची होती.

हेही वाचा…गडकरींच्या विरोधात लढणारे काँग्रेस उमेदवार विकास ठाकरे आहेत तरी कोण?

यातच महानिर्मितीच्या कोराडीतील युनिट क्रमांक १० हा ६६० मेगावॉटचा संच १७ मार्चपासून बॉयलर ट्यूब लिकेजमुळे बंद पडला. त्यामुळे कोराडी प्रकल्पातून रोज होणाऱ्या सुमारे १ हजार ८०० मेगावॉटपर्यंतची वीज निर्मिती कमी होऊन १ हजार ३१४ मेगावॉटवर आली. शनिवारी राज्याला महानिर्मितीच्या औष्णिक वीज निर्मिती प्रकल्पातून ५ हजार ६८५ मेगावॉट, उरन गॅस प्रकल्पातून २६७ मेगावॉट, जलविद्युत प्रकल्पातून १४० मेगावॉट, सौर प्रकल्पातून ८१ मेगावॉट वीज मिळत होती. खासगी प्रकल्पातून ९ हजार २४१ मेगावॉट आणि केंद्राच्या वाट्यातूनही राज्याला ९ हजार ७७९ मेगावॉट वीज मिळाली.

वीज कंपन्यांचे म्हणणे काय?

संच दुरूस्त केला जात असून लवकरच त्यातून वीज निर्मिती होणार असल्याचे महानिर्मितीच्या जनसंपर्क विभागाने सांगितले. तर राज्यात मागणीच्या तुलनेत पुरेशी वीज उपलब्ध असल्याने चिंतेचे कारण नसल्याचा दावा महावितरणच्या जनसंपर्क विभागाने केला.

हेही वाचा…चंद्रपूर: भाजप व काँग्रेसचीच चर्चा, छोटे पक्ष झाकोळले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खासगी प्रकल्पातून होणारी वीज निर्मिती

राज्याला शनिवारी खासगी औष्णिक वीज निर्मिती करणाऱ्या कंपन्यांपैकी अदानीकडून २ हजार ४९७ मेगावॉट, जिंदलमधून १ हजार ३९ मेगावॉट, आयडियल २०५ मेगावॉट, एसडब्लूपीजीएलकडून ४५८ मेगावॉट वीज राज्याला मिळत होती.