नागपूर: माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीन वर्षांआधी मोठा बंड करत शिवसेना फोडली होती. यानंतर झालेल्या विविध निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेमधील अनेक नेते, आमदार, खासदार यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. काही महिन्यानंतर आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत.

या निवडणुकांच्या तोंडावर राज्यात पुन्हा मोठ्या राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता वर्तवली जाते. अशातच आता स्थानिक आणि मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्याने एक खळबळजनक दावा केला आहे. त्यांच्या या दाव्यामुळे काही दिवसांत राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे.

रामटेक लोकसभा क्षेत्राचे माजी खासदार आणि विधान परिषदेचे आमदार कृपाल तुमाने यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील नेत्यांसंदर्भात महत्त्वाचे माहिती जाहीर केलेली आहे. यावेळी त्यांनी संजय राऊत यांच्यावर गंभीर आरोप केलेला आहे. शिवसेना फुटण्यासाठी संजय राऊत जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. तुमाने म्हणाले की, दोन आमदार सोडले तर उर्वरीत सर्व आमदार आणि मुंबई महापालिकेतील जवळपास ८० टक्के उरलेले सर्व माजी नगरसेवक आमच्या संपर्कात असून ते एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी तयार आहेत. त्यामुळे दसरा मेळावा झाल्यानंतर आम्ही ठाकरेंना दणका देणार आहोत.

तसंच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेवर अनेक आमदार नाराज असल्याचंही तुमाने यांनी म्हटलं आहे. ते म्हणाले, खासदार संजय राऊतांना सगळे कंटाळले असून राऊतांमुळे उबाठाचा सत्यानाश झाला आहे. शिवसेनेसाठी दसऱ्याचा दिवस महत्वाचा असतो आणि याच दिवशी पक्षाशी संबंधित अनेक मोठ्या घोषणा झाल्या आहेत, असं सांगत त्यांनी दसऱ्यानंतर शिवसेनेत मोठे पक्षप्रवेश होणार असल्याचंही यावेळी सांगितलं. शिवसेनेतील बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील अनेक आमदार खासदारांसह पदाधिकाऱ्यांनी देखील एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवाय विधानसभा निडवणुकीत महायुतीची सत्ता आल्यापासून हे प्रवेश मोठ्या प्रमाणात सुरूच आहेत.

तर आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि मुंबई महानगर पालिकेची निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून शिंदेंच्या शिवसेनेने ठाकरेंच्या अनेक पदाधिकाऱ्यांना पक्षात येण्याची ऑफर दिल्याचे बोलले जात आहे.