बुलढाणा : चिखली तालुक्यातील अंचरवाडी भरोसा मार्गावरील सावित्री नदीवर पुलच नसल्याने शेतकऱ्यांना जीवावरची कसरत करीत आणि जीव अक्षरशः धोक्यात टाकून आपल्या शेतात जाण्यासाठी नदीपात्रातून प्रवास करावा लागत आहे. यामुळे एखाद्याचा बळी गेल्यावर शासन, प्रशासन कुंभकर्णी झोपेतून जागे होणार का? असा संतप्त सवाल शेकडो शेतकरी आणि गावकरी करीत आहे.

या नदीवर पूल बांधण्याची मागणी प्रशासनाकडे वारंवार निवेदने देवून करण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मागणीची दखल घेण्यात आलेली नाही. पावसाळ्यात चार ते पाच महिने शेतकऱ्यांना शेतातच जाता येत नाही. त्यामुळे, अनेकांची शेती पडीक राहत आहे. तसेच पुर असल्यास शेतकऱ्यांना गुरांना चारा पाणी देणेही शक्य हाेत नाही. शेतकऱ्यांच्या या गंभीर व्यथेकडे प्रशासनाने लक्ष देवून तातडीने पूल बांधण्याची मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थ अनेक वर्षांपासून करीत आले आहे. मात्र बळीराजाचा आवाज सरकार व लोकप्रतिनिधीना ऐकूच येत नसल्याचे दुर्दैवी चित्र आहे.

चिखली तालुक्यातील अंचरवाडी भरोसा रस्त्यावरून जाणारा गावजोड रस्ता थेट नदीपात्रातून जातो. त्यामुळे मुसळधार पावसात वेगाने वाहणाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. अनेक शेतकऱ्यांची कपाशी शेती तसेच दुग्धव्यवसाय आहेत. यामुळे त्यांना मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. काही वेळा चार-पाच दिवस शेतात जाऊन दूध काढणेही शक्य होत नाही. नदीला पुर आल्यास शेतकऱ्यांची माेठी कसरत हाेते. या रस्त्याबाबत याआधीही अनेकदा पाठपुरावा करूनही ठोस उपाययोजना झाल्या नाहीत, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. “रस्ता नसल्याने आमच्याकडे शेती असूनही नसल्यासारखी स्थिती आहे. त्यामुळे शासनाने तातडीने पुलाचे काम हाती घ्यावे,” अशी मागणी करण्यात आली आहे.

चिखली तालुक्यात अतिवृष्टीचा तडाखा

चिखली तालुक्यात गत काही दिवसांपासून जाेरदार पाउस हाेत आहे. ऑगस्ट महिन्यात दाेन वेळा झालेल्या अतिवृष्टीने नदी नाल्यांना पूर आला हाेता. अंचरवाडी येथील सावत्रा नदीलाही माेठा पुर आला हाेता. त्यावेळी चार ते पाच दिवस शेतकऱ्यांना शेतात जाता आले नाही. पावसाळ्यात दरवर्षीच ही समस्या असल्याने त्यावर कायमस्वरूपी ताेडगा काढण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.