लोकसत्ता टीम

नागपूर: राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी यांनी यांत्रिक अभियांत्रिकी क्षेत्रातील डॉ. प्रशांत कडू यांची आंतरविद्याशाखीय शाखेच्या अधिष्ठातापदी केलेली निवड अंगलट आली आहे. राज्यपालांनी कुलगुरूंना नोटीस पाठवून यासंदर्भात स्पष्टीकरण मागितले आहे. त्यामुळे नागपूर विद्यापीठ पुन्हा एकदा नियुक्तीवरून वादात सापडले आहे.

कुलगुरूंनी अपात्र व्यक्तीची नियुक्ती केल्याचा आरोप करत माजी अधिसभा सदस्य ॲड. मनमोहन बाजपेयी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली होती. या याचिकेत त्यांनी थेट राज्यपाल, कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, कुलसचिव डॉ. राजू हिवसे आणि डॉ. प्रशांत कडू यांना प्रतिवादी केले. काही दिवसांआधीच उच्च न्यायालयाने राज्यपालांसह सर्व प्रतिवादींना नोटीस बजावली आणि दोन आठवड्यांत उत्तर मागितले होते. त्यानंतर आता राज्यपालांनी विद्यापीठाला या नियुक्तीवर स्पष्टीकरण मागितले आहे. यामुळे डॉ. कडू यांची नियुक्ती कुलगुरूंना भोवणार अशी चर्चा आहे.

आणखी वाचा- ‘चर्च ऑफ नॉर्थ इंडिया’च्या कार्यालयावर ‘ईडी’चा छापा

नागपूर विद्यापीठाच्या आंतरविद्याशाखीय शाखेत शिक्षण, शारीरिक शिक्षण, जनसंवाद, ग्रंथालय आणि कायदा या क्षेत्रांचा समावेश होतो. अशा परिस्थितीत आंतरविद्याशाखीय शाखेचे अधिष्ठाता म्हणून या शाखांमधून तज्ज्ञ व्यक्तीची निवड करणे आवश्यक आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे कुलगुरूंनी यांत्रिक अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य असलेल्या डॉ. प्रशांत कडू यांची या शाखेच्या अधिष्ठातापदी नियुक्ती केली. त्यांच्या नियुक्तीपूर्वीही हा विषय चर्चेत होता.

सुरुवातीपासूनच विविध स्तरातून याला विरोध होत होता. मात्र, सर्व विरोध डावलून डॉ. कडू यांना अधिष्ठाता करण्यात आले. त्यावेळीही याचिकाकर्त्याने या संपूर्ण प्रकरणाची राज्यपालांकडे तक्रार केली. आता विद्यापीठाला यासंदर्भात स्पष्टीकरण मागण्यात आले आहे. त्यामुळे राज्यपालांकडून चुकीच्या नियुक्तीवर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.