नागपूर : चिमण्यांच्या बाबतीत असे म्हंटले जाते की पिलांना माणसांचा स्पर्श झाला तर ती चिमणी त्या पिलांना स्वीकारत नाही किंवा ते ती त्यांना मारून टाकते. पण छत्रपती संभाजी नगरात वेगळीच गोष्ट घडली. एरवी आईपासून दुरावलेल्या बछड्यांचे काही दिवसातच आईशी पुनर्मिलन झाल्याच्या कित्येक घटना राज्यात घडल्या आहेत, पण छत्रपती संभाजी नगरात आक्रीतच घडले. मादी बिबट्याच्या बछड्यांना मानवी स्पर्श झाला म्हणून चक्क मादी बिबट्याने बछड्यांना नाकारले. शेवटी त्या अनाथ बिबट्यांना नागपुरातील गोरेवाडा बचाव केंद्राने आश्रय दिला.
वैजापूर तालुक्यातील बिरोळा-जीरी परिसरात दहा दिवसांपूर्वी ऊसतोडीच्या कामात असलेल्या मजुरांना दोन बिबट्याची पिल्ले दिसून आली. कुतूहलापोटी त्यांनी त्या बिबट्याच्या पिलांना उचलले. अज्ञानातून या पिल्लांना काहींनी हाताळल्याची माहिती पुढे येताच वनविभागाने त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्या आईपर्यंत पुन्हा पोहोचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले. मात्र, या पिल्लांना मानवाचा स्पर्श झाल्याने मादी रोज रात्री त्या ठिकाणी येऊनही त्यांना घेऊन निघत नसल्याने परिस्थिती अधिक गुंतागुंतीची बनली. स्थानिकांमध्येही या घटनेबद्दल उत्सुकता आणि चिंता दोन्ही निर्माण झाली. पिल्लांना नैसर्गिक अधिवासात सुरक्षित ठेवण्यासाठी प्राणिमित्र आणि वनकर्मचारी सातत्याने काम करत होते, पण आईशिवाय बछड्यांना एकटे ठेवणेही धोकादायक होते.
परिसरात शांतता राखणे, नागरिकांची गर्दी थांबवणे, आवाज कमी ठेवणे अशा उपाययोजना राबवून पिल्लांच्या आसपास सुरक्षित वातावरण निर्माण करण्यात आले. नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आणि पिल्लांपासून दूर राहण्याचे निर्देशही देण्यात आले. जवळच काही दिवसांपूर्वी रानात पाचट जळून गेल्यानंतर परिसर उघडा झाला आहे. तरीही नाइट-व्हिजन कॅमेऱ्यांत मादी बिबट्या सदैव पिल्लांच्या आसपास फिरताना दिसली. पण मानवी गंधामुळे ती जवळ असूनही पिल्लांना सोबत घेऊन गेली नाही. त्यामुळे ही लहान पिल्ले भुकेमुळे आणि इतर वन्य प्राण्यांच्या संभाव्य हल्ल्यामुळे धोक्यात आली. ऊसतोडीच्या वेळी कामगारांना मादी बिबट्या आणि तीन पिल्ले दिसल्याने अचानक आरडाओरड झाली. त्यातून मादी दोन पिल्लांना घेऊन दूर गेली, पण एक पिल्लू मागे पडले. उत्सुकतेमुळे अनेकांनी त्याला हात लावला. दरम्यान, जवळच सापडलेल्या दुसऱ्या पिल्लालाही काही ग्रामस्थांनी स्पर्श केल्याचे समजले. त्यामुळे दोन ठिकाणची पिल्ले मानवाच्या संपर्कात आल्याची बाब वनविभागाला कळताच पथकाने तातडीने त्यांचे निरीक्षण सुरू केले. वनविभागाने गेल्या दहा दिवसांपासून विशेष कॅमेरे, पावलांचे ठसे, पिंजरे आणि रात्रीच्या हालचालींच्या आधारे मादीचा शोध घेत तिला पिल्लांच्या जवळ आणण्याचे कसून प्रयत्न सुरू ठेवले, पण त्यात ते अपयशी ठरले.
दिनांक १८ ऑक्टोबर २०२५ रोजी वन्यप्राणी बचाव केंद्र गोरेवाडा प्रकल्प नागपूर येथे वन्यप्राणी बिबटची २ पिल्ले छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधून दाखल झाली. सदर पिल्लांचे वय अंदाजे एक महिना असून ती आईपासून विलग झालेली आहेत. वनविभागाने पिलांचा आईसोबत मिलाप करण्याचा प्रयत्न केला मात्र मादा पिले घेण्यासाठी आली नाही त्यामुळे सदर पिल्ले हे गोरेवाडा प्रकल्प, नागपूर येथे पाठवण्यात आलेली आहेत.
