नागपूर : आधी मुंबई, मग नाशिक आणि आता नागपूर… बिबट्यांनी त्यांचा मोर्चा शहराकडे वळवल्याने राज्याच्या राजधानीसह उपराजधानीतही आता नागरिकांमध्ये बिबट्यांची भीती पसरू लागली आहे. मुंबईच्या गर्दीवर आता माणसांचीच मक्तेदारी राहिली नाही, तर बिबट्यांची गर्दी देखील तेवढीच वाढली आहे. त्यामुळे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळ आणि शहराच्या इतर भागांमध्येही बिबट्यांचे दर्शन अनेकदा होते.
नाशिकच्या शहरी भागासह ग्रामीण भागातील नागरिकांना बिबट्याचा वावर काही नवीन नाही. मात्र, बिबट्याचे वारंवार होणारे दर्शन, हल्ले आणि हुलकवणीच्या घटना सातत्याने समोर येत आहे. त्यामुळे बिबट्यांचे शहर म्हणून नाशिकची नवी ओळख होत आहे. तर आता अलीकडच्या काही वर्षात उपराजधानी म्हणजेच नागपूर शहरातही बिबट्यांचा वावर सातत्याने आढळून येत आहे.
शहरात अलीकडच्या काही वर्षात वन्यप्राण्यांचा शिरकाव वाढत चालला आहे. वाघ आणि बिबटांचा वावर शहर परिसरात आढळून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून वर्धा मार्गावरील झरी परिसरातील पलोटी महाविद्यालयाजवळ एका बिबट्याच्या भटकंतीची चित्रभ्तत समाजमाध्यमावर मोठ्या प्रमाणात सामाईक झाली आहे. झरी येथून रस्ता ओलांडून हा बिबट जामठा येथे गेल्याचे सांगितले जात असून पलोटी महाविद्यालयाजवळ तो फिरत होता की नाही, यावर मात्र शिक्कामाेर्तब होऊ शकले नाही.
नागपूर जिल्ह्यातील सेमिनरी हिल्स वनक्षेत्र व बुटीबोटी वनक्षेत्राला हे क्षेत्र लागून आहे. त्यामुळे बिबट कोणत्या वनक्षेत्रात फिरत आहे हे अजूनही स्पष्ट झाले नाही. बिबट्याची ही चित्रभ्तत सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्र कार्यालयातील अधिकाऱ्यांपर्यंत देखील पोहोचली. त्यांनी झरी परिसरातील वनपालाने पलोटी महाविद्यालय आणि आजूबाजूच्या परिसराचीही पाहणी केली. मात्र, कुठेही बिबट किंवा त्याच्या अस्तित्त्वाच्या खाणाखुणा आढळल्या नाहीस. काही वन्यजीवप्रेमींच्या मते झरी, वेळा हरी आणि बुटीबोरी वनक्षेत्राला लागून असलेला हा परिसर वर्षानुवर्षे वन्यप्राण्यांचा भ्रमणमार्ग आहे.
नागपूर शहरात यापूर्वीदेखील मिहान परिसरात वाघाचे, बिबट्याचे तर हिंगणा, अंबाझरी, आयटी पार्क परिसरात बिबट्याचा वावर आढळला आहे. वर्धा मार्गाजवळील झरी आणि वेळा क्षेत्र, उमरेड वनक्षेत्र आणि बुटीबोरी वनक्षेत्र यांच्यातील एक मार्ग आहे. म्हणूनच या भागात वाघ, बिबट्या, कोल्हे, रानडुक्कर आणि हरीण फिरताना दिसतात. त्या भागात वन्यप्राण्यांची उपस्थिती नोंदवली गेली आहे, असे राज्य वन्यजीव मंडळाचे माजी सदस्य कुंदन हाते म्हणाले. ही चित्रफीत मिळाल्यानंतर आम्ही तपास सुरू केला. याठिकाणी पाहणी केली असता बिबट आढळला नाही, असे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश भडांगे यांनी सांगितले.