साधूंच्या निधनाने साहित्य वर्तुळात शोक

साहित्य आणि पत्रकारिता अशा दोन्ही क्षेत्रात आपली मोहोर उमटवणारे ज्येष्ठ साहित्यिक आणि पत्रकार अरुण साधू यांच्या निधनाने साहित्य क्षेत्रात दु:ख व्यक्त करण्यात आले.  साधू यांच्या निधनाची बातमी कळल्यावर साहित्य आणि पत्रकार क्षेत्रातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला. त्यांच्या निधनाने ज्येष्ठ कथाकार, साहित्यिक आणि सामाजिक क्षेत्रात लेखन करणारा कांदबरीकार हरपला, अशी प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या.

लोकानुवर्ती विचाराचा मूलाधार

२००७ मध्ये नागपुरात झालेल्या ८० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते आणि त्याचे यजमानपद विदर्भ साहित्य संघाकडे होते. मूळचे ते विदर्भाचे असल्यामुळे त्यांच्याशी जवळीक होती. कुठल्याही विषयावर भूमिका घेऊन त्यावर ठाम राहणारे होते. समताधिष्ठित समाजासाठीचा लोकानुवर्ती विचार हा त्यांच्या लेखनाचा व पत्रकारितेचा मूलाधार होता. मराठीत वेगळ्या शैलीची, वेगळ्या विषयाची आशयाची समृद्ध भर त्यांनी घातली. राजकीय कादंबरी त्यांनी प्रतिष्ठित व समृद्ध केली.

– डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी, अध्यक्ष, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ

लेखन वैचारिक आणि विचार करायला लावणारे

ज्येष्ठ कथाकार, साहित्यक आणि श्रेष्ठ पत्रकार, सामाजिक क्षेत्रात लेखन करणारे कांदबरीकार म्हणून त्यांची ख्याती होती. ‘मुंबई दिनांक’ आणि ‘सिंहासन’ या दोन्ही कादंबऱ्या पृथकात्मक कादंबरीचे निर्देशांक आहेत. मराठी राजकीय कादंबरीतून संपूर्ण नव्या युगात प्रवेश करण्याचे सामर्थ्य त्यांच्या कादंबरीत होते. सामाजिक व राजकीय जीवनाचा अनुभव कलारूप पातळीवर नेणारा असा थोर कादंबरीकार निघून जाणे ही साहित्य क्षेत्राची मोठी हानी आहे.

– डॉ. अक्षयकुमार काळे, अध्यक्ष, ९० अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन.

चांगला मित्र गमावला

नागपूर संमेलनाच्या त्यांच्यासोबतच्या अनेक आठवणी आहेत. त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. पत्रकार आणि साहित्यिक म्हणून ते मोठे होते. त्यांच्या निधनाने मी मित्र गमावला आहे.

– मनोहर म्हैसाळकर, अध्यक्ष, विदर्भ साहित्य संघ

संवेदनशील मनाचा कादंबरीकार

मराठी साहित्य सृष्टीतील महत्त्वाचा आणि संवेदनशील मनाचा कादंबरीकार म्हणून अरुण साधू यांचे नाव घेतले जाते. साहित्य लेखन करताना त्यांनी पत्रकारितेत वेगळा ठसा उमटवला. राजकारण, समाजकारण अतिशय जवळून बघत त्या अनुभवातून त्यांनी लेखन केले आहे. नागपूरला झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आणि तो विदर्भासाठी मोठा सन्मान होता. त्यावेळी त्यांनी केलेले भाषण हे चाकोरीबाहेरचे होते. विज्ञाननिष्ठ विचार त्यांनी त्यावेळी मांडला होता. त्यांच्या निधनाची बातमी ऐकल्यानंतर मला आणि साहित्य क्षेत्राला धक्का बसला.

– वसंत आबाजी डहाके, ज्येष्ठ समीक्षक व माजी संमेलनाध्यक्ष

चांगला लेखक गमवला

नाशिकमध्ये झालेल्या एका कार्यक्रमात त्यांच्या ‘मुखवटा’ या कांदबरीवर भाष्य केले होते. ती कादंबरी मला फारच आवडली होती आणि त्याला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. मात्र तो मिळाला नाही. राजकारण, समाजकारण आणि ललित लेखन अशा विविध वाङ्मय प्रकारात त्यांनी लेखन केले. लेखक म्हणून ते मोठे होते. राजकारण सुद्धा ते वेगळ्या तऱ्हेने मांडत होते. नागपूरला झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष असताना त्यांच्याशी बोलणे झाले होते. साहित्य क्षेत्रातील एक चांगला लेखक काळाच्या पडद्याआड गेला.

– आशा बगे, ज्येष्ठ साहित्यिक

साधूंबरोबर पुरस्कार हाच मोठा गौरव

‘जेरबंद’ नावाच्या माझ्या पुस्तकासाठी अरुण साधू यांची प्रस्तावाना हवी होती. त्यांनी संबंधित विषयावर लेखन केले होते. त्यांच्या निवासस्थानी गेलो असता त्यांनी सुरुवातीला नकार दिला. मात्र, त्यानंतर काव्यसंग्रह वाचून एक महिन्यांनी लिहून पाठवतो, असे ते म्हणाले, परंतु तिसऱ्याच दिवशी त्यांची प्रस्तावना आली होती. अरुण साधू, य.दी. फडके आणि मला दमानी पुरस्कार मिळाला होता आणि पुरस्कार समारंभ सोलापूरला झाला होता. त्या कार्यक्रमात या दोन मोठय़ा साहित्यिकांसोबत पुरस्कार मिळाल्याने माझ्यासाठी तो मोठा गौरव होता.

– लोकनाथ यशवंत, कवी

विचारवंत लेखक गमावला

साधू यांच्या निधनाने मराठी साहित्यसृष्टीने एक विचारवंत लेखक गमावला आहे. त्यांनी ज्ञानसाधना करून स्वत:चे अस्तित्व निर्माण केले आहे. ते अध्यक्ष असलेल्या नागपूरच्या साहित्य संमेलनाच्यावेळी स्वागताध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी होती. त्यावेळी साहित्य संमेलनात वाद निर्माण झाला होता. राजकारणाचा साहित्य क्षेत्रातील वावरावर त्यांचा आक्षेप होता. या आशयाचे त्यांचे वादग्रस्त वक्तव्य गाजले. साहित्याच्या सर्व क्षेत्रात आपली छाप उमटवणाऱ्या या लेखकाच्या जाण्याने कधीच भरून न निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.

– गिरीश गांधी, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते

वाचकांच्या मनावर अधिराज्य गाजवले

अरुण साधू ३० वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत होते. विविध दैनिकांमध्ये काम करुन त्यांनी दैनिकांचा नावलौकिक वाढविला. झिपऱ्या, तडजोड, त्रिशुंकू, बहिष्कृत, मुखवटा शुभमंगल, शोधयात्रा, स्फोट या सारख्या कादबऱ्याच्या माध्यमातून त्यांनी वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजविले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

– अतुल लोंढे, काँग्रेस प्रवक्ता