लोकसत्ता टीम

चंद्रपूर : चंद्रपूर-वणी-आर्णी लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारीवरून काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि आमदार प्रतिभा धानोरकर यांच्यात चढाओढ सुरू आहे. विजय वडेट्टीवार यांचे नाव समोर येताच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व आमदार धानोरकर यांचे दीर तथा भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी गुरुवारी सकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. लोकसभेची उमेदवारी आमदार प्रतिभा धानोरकर यांनाच द्यावी, अशी आग्रही मागणी त्यांनी पवारांकडे केली. त्यामुळे महाविकास आघाडीच्या आजच्या मुंबईतील बैठकीत चंद्रपूर लोकसभेच्या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

विजय वडेट्टीवार यांनी प्रतिभा धानोरकर यांना वगळता अन्य कुणालाही उमेदवारी द्या, असा आग्रह केंद्रीय समितीकडे धरला आहे, तर प्रतिभा धानोरकर यांनी उमेदवारीवर माझाच हक्क आहे, असा दावा केला आहे. काँग्रेसच्या केंद्रीय समितीने एक तर विजय वडेट्टीवार यांनी ही जागा स्वतः लढावी अथवा प्रतिभा धानोरकर यांना संधी द्यावी, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे वडेट्टीवार यांची अडचण झाली आहे.

आणखी वाचा- नागपूर लोकसभा: काँग्रेस आमदार विकास ठाकरेंच्या होकारामागे कोणाचे बळ?

विजय वडेट्टीवर यांना विरोध

आता चंद्रपूर लोकसभेच्या रिंगणात उतरावे लागणार अथवा प्रतिभा धानोरकर यांचा मार्ग मोकळा करावा लागणार, याशिवाय विजय वडेट्टीवार यांच्यासमोर दुसरा पर्याय नाही. मात्र शेवटच्या घटकेला विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला तर प्रतिभा धानोरकर यांचे काय? हा प्रस्न आहे. विजय वडेट्टीवार यांना उमेदवारी मिळू नये, यासाठी चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य सक्रिय झाले आहेत. वैद्य यांनी भद्रावतीचे माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्यासोबत मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी आज शरद पवार यांची भेट घेतली व धानोरकर यांना उमेदवारी द्या, अशी मागणी केली.

आणखी वाचा- नागपूर : आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमजवळ वाघाचा संशयास्पद स्थितीत मृतदेह

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चंद्रपूरची जागा राष्ट्रवादीने घ्यावी, वर्धा काँग्रेसला द्यावी!

यासंदर्भात वैद्य यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, शरद पवार हे प्रतिभा धानोरकर यांच्या उमेदवारीबद्दल सकारात्मक आहेत. मुंबईत आज महाविकास आघाडीची बैठक आहे. त्यात या विषयावर चर्चा होणार आहे. प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी देण्यास विजय वडेट्टीवार तयार नसतील तर चंद्रपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे घ्यावी व वर्धेची जागा काँग्रेसला द्यावी, असा पर्याय आम्ही शरद पवार यांच्यापुढे ठेवला. चंद्रपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसने स्वतःकडे घेतली तर आमदार धानोरकर यांना राष्ट्रवादीत घेऊन निवडणूक लढता येईल, असेही वैद्य यांनी शरद पवार यांना सांगितले. मात्र, आता भरपूर वेळ झाली, तसे करता येणार नाही, असे शरद पवार यांनी स्पष्ट केल्याचे वैद्य यांनी सांगितले.