लोकसत्ता टीम

अकोला : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा ज्वर चढला आहे. जाहीर सभांमधून प्रचाराचा धुरळा उडण्यास सुरुवात झाली आहे. भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांच्या प्रचारार्थ गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा दीड महिन्यांत दुसऱ्यांदा अकोल्यात दाखल होणार आहेत. काँग्रेस व वंचितचादेखील सभांमधून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न सुरू आहे.

अकोला लोकसभा मतदारसंघात २६ एप्रिलला दुसऱ्या टप्प्यात मतदान होणार आहे. मतदारसंघात परंपरेनुसार पुन्हा एकदा तिरंगी लढत आहे. भाजपचे धोत्रे, काँग्रेसचे डॉ. अभय पाटील व वंचितचे ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यात अटीतटीचा सामना असल्याचे दिसून येते. तिन्ही उमेदवारांकडून जोरदार प्रचार मोहीम राबवली जात आहे. प्रमुख उमेदवारांकडून मतदारांच्या भेटीगाठी, मेळावे, कॉर्नर सभा, बैठकांसह जेवणावळी उठवण्यात आल्या. पहिल्या टप्प्यातील मतदान १९ एप्रिलला पार पडल्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात मतदान होणाऱ्या मतदारसंघांकडे राष्ट्रीय व राज्य स्तरावरील वरिष्ठ नेत्यांनी मोर्चा वळवला आहे.

आणखी वाचा-यवतमाळमध्ये ‘वंचित’चे बळ नवख्या पक्षाच्या उमेदवारास

धोत्रे यांच्या प्रचारासाठी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची नियोजित सभा रद्द करण्यात आली. आता धोत्रे यांच्या प्रचारासाठी २३ एप्रिलला देशाचे गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शहा अकोल्यात दाखल होणार आहेत. शहरातील अकोला क्रिकेट मैदानावर मंगळवारी दुपारी त्यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अमित शहा यांनी अकोल्यात पश्चिम विदर्भातील मतदारसंघांचा आढावा घेतला होता. त्यानंतर आता अवघ्या दीड महिन्यातच ते प्रचारासाठी पुन्हा एकदा अकोल्यात येणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आदी उपस्थित राहणार आहेत. काँग्रेस उमेदवार डॉ. पाटील यांच्या प्रचारासाठी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रचारसभा घेतल्या आहेत. वंचित आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर निवडणूक रिंगणात असल्याने ते स्वत:च प्रचार सभा घेऊन मतदारांना साद घालत आहेत. त्यांच्यासाठी प्रा. अंजली आंबेडकर, सुजात आंबेडकर मतदारसंघ पिंजून काढत आहेत. आता जाहीर प्रचारासाठी केवळ तीन दिवसांचा कालावधी शिल्लक असून प्रचार तोफा जोरदार धडाडत आहेत.

आणखी वाचा-ज्येष्ठ गांधीवादी धीरूभाई मेहता यांचे निधन; कस्तुरबा हेल्थ सोसायटी झाली पोरकी

आरोप-प्रत्यारोपांचे सत्र

प्रचार सभांमधून प्रमुख तिन्ही उमेदवारांमध्ये आरोप-प्रत्यारोपाचे सत्र देखील सुरू आहे. भाजपकडून विकासात्मक मुद्यांसह जोर दिला गेला, तर काँग्रेस व वंचितची प्रचार मोहीम मतदारसंघातील समस्या व प्रश्नांभोवती केंद्रीत आहे.