नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील पाच लोकसभा मतदारसंघातील प्रचार १७ एप्रिल रोजी सायंकाळी ५ वाजता संपणार आहे. यानंतर छुप्या बैठकांना जोर येईल. येथे महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत असून मतदारांचा कौल कुणाला, यावरून तर्क-वितर्क लावण्यात येत आहे. यंदाच्या निवडणुकीत महायुतीतील भाजप आणि महाविकास आघाडीतील काँग्रेसमध्येच थेट लढत आहे. नागपुरात नितीन गडकरी विरुद्ध विकास ठाकरे, रामटेकात राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे, भंडारा-गोंदियात सुनील मेंढे विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे, गडचिरोली-चिमूरमध्ये अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसान आणि चंद्रपुरात सुधीर मुनगंटीवार विरुद्ध प्रतिभा धानोरकर, अशी थेट लढत होत आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चंद्रपूर आणि नागपूरच्या कन्हानमध्ये महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ सभा घेतल्या. गृहमंत्री अमित शहा आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याही सभा झाल्या. महाविकास आघाडीकडून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भंडारा जिल्ह्यात तर पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंनी नागपुरात सभा घेतल्या. भाजपचे ज्येष्ठ नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, तर काँग्रेसकडून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपच्या आग्रहाखातर रामटेकचा उमेदवार ऐनवेळी बदलणा-या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासाठी रामटेकची लढत महत्त्वाची ठरणार आहे.

हेही वाचा : ‘आर्ची’च्या मनमोहक अदांमुळे रविना टंडनही घायाळ! अनेक सेलिब्रिटींना…

पूर्व विदर्भातील पाचपैकी चार जागा महायुतीच्या ताब्यात

पूर्व विदर्भातील पाचपैकी चार लोकसभा मतदार संघांमध्ये महायुतीचे वर्चस्व आहे. नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर या तीन मतदार संघात भाजपने गडकरी, मेंढे आणि अशोक नेते या विद्यमान खासदारांवरच डाव खेळला आहे, तर शिवसेना शिंदे गटाने रामटेकातील विद्यमान खासदार कृपाल तुमाने यांच्या जागी काँग्रेसमधून आलेल्या राजू पारवे यांना रिंगणात उतरवले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत चंद्रपुरातील काँग्रेसचे उमेदवार दिवं. सुरेश उर्फ बाळू धानोरकर यांनी भाजपचे हंसराज अहीर यांचा पराभव केला होता. यंदा काँग्रेसने दिवं. धानोरकर यांच्या पत्नी आमदार प्रतिभा धानोरकर यांना येथून उमेदवारी दिली आहे. बाळू धानोरकर २०१९ मध्ये महाराष्ट्रातील काँग्रेसचे एकमेव खासदार ठरले होते. शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटदेखील पूर्व विदर्भातील पाच लोकसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ मैदानात उतरला आहे.

हेही वाचा : लोकसभा निवडणुकीत मेघे कुटुंब प्रथमच दिसेनासे! नेमके कारण काय? वाचा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मतदारांच्या मनात काय?

या निवडणुकीत विद्यमान विरुद्ध नवख्यांच्या सामन्यात कोण बाजी मारतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. १७ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्याचील प्रचार संपणार असून त्यानंतर छुप्या बैठकांवर सर्व पक्षांचा जोर राहील. विदर्भ हा काँग्रेसचाच गड मानला जायचा, कालांतराने भाजपने यावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले. आता पूर्व विदर्भातील मतदार कोणाला कौल देणार, महायुती आपले वर्चस्व कायम राखणार की महाविकास आघाडीला पूर्व विदर्भात ‘अच्छे दिन’ येणार, याबाबत राजकीय वर्तुळासह मतदारांमध्ये विविध तर्क लावले जात आहेत.