अरे, आमच्या नितीनभाऊ गडकरींना तुम्ही समजता काय? ते लोकनेते आहेत. केवळ नागपूर व विदर्भाचे नाहीत तर संपूर्ण देशाचे. याची कल्पना नाही का तुम्हाला? असेल तर मग वारंवार धमकी कशाला देता? तीही साध्या दूरध्वनीवरून. हिंमत असेल तर थेट समोर येऊन द्या ना! गडकरी घाबरतील असे वाटते का तुम्हाला? अशा खूप धमक्या पचवल्यात त्यांनी. केवळ विकास आणि विकास हेच एकमेव ध्येय ऊरी बाळगून आजवर वाटचाल करत आलेत ते. त्यांच्यासारखा कामाचा झपाटा असलेला मंत्री देशात शोधूनही सापडणार नाही. अशा धमक्या देऊन त्यांच्या झपाट्याला ब्रेक लागेल अशा समजुतीत तुम्ही असाल तर ती भ्रामक आहे हे वेळीच लक्षात घ्या व हे धमकीसत्र ताबडतोब थांबवा. सध्याच्या प्रचलित सत्ताकारणात कुणाला धमक्या द्यायच्या हेही तुम्हाला कळत नसेल तर तुम्ही मूर्ख आहात. अशा अज्ञात व्यक्तीकडून अथवा नामचीन गुंडाकडून आलेल्या धमक्यांनी लोकप्रियता वाढते असा समज असलेले अनेक नेते आहेत सध्याच्या राजकारणात. असे काही घडले की स्वत:ची सुरक्षा वाढवून घ्यायची. एकदोन जास्तीचे जवान आजूबाजूला उभे करायचे व स्वत:चे महत्त्व वाढवून घ्यायचे. गडकरी त्यातले नाहीत हे एव्हाना तुमच्या लक्षात आलेच असेल. त्यांनी या प्रकरणाचा अजिबात बाऊ केला नाही. त्यावर चकार शब्द काढला नाही. सुरक्षेचे जोखड तर त्यांना हवेच नसते. त्यामुळे पोलिसांनी घेतलेल्या काळजीकडेही त्यांनी फार लक्ष दिले नाही. मुख्य म्हणजे ते आपल्या ध्येयापासून जराही विचलित झालेले दिसले नाहीत. तरीही तुम्ही वारंवार धमक्या देतच आहात. कशासाठी? काय मिळवणार आहात यातून?

गडकरींचे काम रस्ते बांधणीचे. त्याचा तुमच्या गुन्हेगारी वर्तुळाशी काहीएक संबंध नाही. खूप वर्षांपूर्वी उत्तरेकडील राज्यात अशी कंत्राटे मिळवण्यासाठी गुन्हेगारांचा वापर केला जायचा. ती परिस्थिती केव्हाच हद्दपार झाली. गडकरी केंद्रात मंत्री झाल्यावर तर त्यांनी या कंत्राट पद्धतीत कमालीची पारदर्शकता आणली. हे करताना त्यांना अजिबात गुन्हेगारी जगताशी सामना करावा लागला नाही. त्याचा परिणामही रस्तेविकासाच्या वाढीत दिसून आला. हेच चांगले व गुळगुळीत रस्ते तुमच्यासारख्या गुन्हेगारांना वेगाने पलायनासाठी फायदेशीर ठरू लागले. खरे तर यासाठी तुम्ही गडकरींचे आभार मानायला हवेत. ते सोडून धमकी कशाला देता? नागपूर असो वा दिल्ली, गडकरींनी कधी कुणा गुंडाविषयी चकार शब्द काढला नाही. उलट त्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रात अनेक गुंडांचे हृदयपरिवर्तन घडवून आणले. त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले. त्यावरून झालेल्या टीकेची पर्वाही त्यांनी कधी केली नाही. तसाही त्यांचा स्वभाव अशी पर्वाबिर्वा करण्याचा नाही. एखाद्या कृतीतून काही चांगले घडत असेल तर न घाबरता ती करायची असाच त्यांचा खाक्या राहिला. तरीही त्यांनाच ‘लक्ष्य’ करण्याचे कारण काय? त्या जयेश नावाच्या कर्नाटकी गुंडाला पोलिसांनी पकडले, तो सध्या पोलिसांसमोर काहीबाही बरळतो. कट्टरता व धार्मिक धृवीकरणाला कंटाळून धर्मपरिवर्तन केले असे म्हणतो. हे खरे की खोटे हे त्यालाच ठाऊक पण यात गडकरींचा संबंध येतोच कुठे? मग त्यांनाच धमकीचा दूरध्वनी का?

अख्ख्या आयुष्यात गडकरींनी कधीही धार्मिक कट्टरता अंगीकारली नाही. २०१४ नंतर सत्तेच्या वर्तुळातले अनेक जण याच्या आहारी गेले पण गडकरी समंजसपणाने राजकारण करत राहिले. विरोधक काही शत्रू नाहीत. सर्वच धर्माचे लोक राष्ट्रप्रेमी असू शकतात, त्यामुळे कुणाचा द्वेष करण्याची काही गरज नाही हेच त्यांच्या राजकारणाचे सूत्र राहिले. त्याला समाजाच्या सर्व वर्गातून चांगला पाठिंबा सुद्धा मिळाला. तरीही धमकीसाठी त्यांचीच निवड का? आहेत की असे अनेक कट्टरतावादी आजूबाजूला. त्यांच्याकडे लक्ष द्यायचे सोडून गडकरींच्या कार्यालयातील क्रमांक शोधण्याचे कारण काय? गडकरींच्या या सहिष्णू राजकारणाचा त्रास तुमच्यासारख्या गुन्हेगारांना होण्याचे कारणच नाही. त्यांच्याच पक्षातल्या अनेकांना तो होतो. त्यावरून त्या साऱ्यांची कशी चरफड होते तेही माध्यमांनी उघड्या डोळ्यांनी बघितलेले. या अंतर्गत राजकारणाशी तुमच्यासारख्या गुन्हेगारांचा संबंध नाही. मग धमकीसाठी त्यांचीच निवड करण्याचे कारण काय? होय, हे खरे की गडकरी स्पष्टवक्ते आहेत. जे आहे ते तोंडावर बोलून मोकळे व्हायचे. त्यासाठी खास नागपुरी भाषेचा वापर करायचा. कुणाच्या राजी-नाराजीची तमा बाळगायची नाही. खोटी आश्वासने देऊन लोकांना झुलवत ठेवायचे नाही हीच त्यांची कार्यशैली. ती अनेकांना आवडते. राजकारणातील काहींना ती आवडत नसेल. त्यांच्या सांगण्यावरून तर हे धमकीसत्र तुम्ही राबवत नाही ना! अशी स्पष्ट बोलणारी, तरीही मनाने प्रेमळ असणारी गडकरींसारखी माणसे राजकारणात हवी आहेत. सध्याच्या विषाक्त वातावरणात तर त्याची खूपच गरज आहे. हे साधे तत्त्व तुमच्यासारख्या अट्टल गुन्हेगारांना कळत नाही काय?

कळत असेल तर मग ही धमकीची नाटके कशासाठी? कुणाच्या सांगण्यावरून? अशा पद्धतीने एका चांगल्या नेत्याला नाहक चर्चेत आणण्याची गरज काय? गेल्या नऊ वर्षांपासून गडकरी चर्चेत आहेत ते त्यांच्या कामामुळे. हेच काम त्यांची लोकप्रियता देशभर वाढवण्यासाठी उपयोगी पडणारे. ही लोकप्रियता इतकी मोठी की कधी कधी इतर नेत्यांना सुद्धा मागे टाकणारी. त्यातून निर्माण झालेल्या असूयेचा सामनाही त्यांना अनेकदा करावा लागला. काहीवेळा तर त्यांना सर्वाधिक गुण मिळालेली सर्वेक्षणे सुद्धा अडगळीत टाकण्यासाठी माध्यमांना बाध्य केले गेले. तरीही गडकरींनी त्यावर कधी चकार शब्दाने प्रतिक्रिया दिली नाही. त्यांना उचकवण्याचे प्रयत्नही बरेच झाले. तरीही ते शांत राहिले. मग त्यांच्या ठिकठिकाणच्या वक्तव्यावरून वादंग निर्माण करण्याचे प्रयत्न झाले. काहीवेळच्या स्पष्टीकरणांचा अपवाद सोडला तर गडकरींनी त्याकडेही कधी लक्ष दिले नाही. देशात सत्ता आल्यावर त्यांच्या दिल्लीच्या कार्यालयात हेरगिरी करणारी उपकरणे बसवण्याचा प्रयत्न झाला. त्याचा गवगवा माध्यमांनी केला पण गडकरी मात्र विचलित झाले नाहीत. काहीही केले तरी गडकरी बधत नाहीत, उलट त्यांच्या लोकप्रियतेत कमालीची वाढच नोंदवली जात आहे हे बघून अशी धमकीसत्रे सुरू झाली असतील का? वर उल्लेख केलेली असूया याला कारणीभूत असेल का? तेव्हा गुन्हेगारांनो, यावरही जरा साधकबाधक विचार तुम्ही करणे आवश्यक. कुणाच्या हातची बाहुली होणे तुम्हाला आवडते हे ठाऊक आहे आम्हाला. तुमच्या वर्तुळात याला सुपारी घेणे म्हणतात. तशी ती घेऊन तुम्ही गडकरींना त्रास देत असाल तर खबरदार! गडकरी अशा धमक्यांना भीक घालत नाहीत. अरे ला कारे ने उत्तर देण्याचा गुण आहे त्यांच्यात पण तेव्हाच जर समोरचा त्यांच्या तोडीचा असेल तर! तुमच्यासारख्या फुटकळ गुन्हेगारांमुळे त्यांचे काहीही नुकसान होणार नाही हे लक्षात घ्या व हा पोरखेळ थांबवा आता.

देवेंद्र गावंडे

devendra.gawande@expressindia.com