मान्यवरांच्या आयुष्यातील ‘राहिलेल्या गोष्टी’चा रंजकपट उलगडणार

नाविन्यपूर्ण विषयाला वाहिलेला विदर्भरंग दिवाळी अंक दरवर्षी वाचकांसाठी नवीन काही घेऊन येतो. ‘लोकसत्ता’ने यावर्षीही ती परंपरा कायम राखली आहे. प्रसिद्धीच्या वलयांकित खिडकीतून मागे वळून पाहताना जे हवे होते ते गवसले की निसटले.. जर निसटले असेल तर ते नेमके काय होते, याचा शोध घेणारे विदर्भातील विविध क्षेत्रातील मान्यवर या अंकातून वाचकांच्या भेटीला येत आहेत.

बालपण म्हणजे स्वप्नांचा काळ आणि तारुण्य म्हणजे त्या स्वप्नांच्या पूर्तीचा काळ, पण आयुष्याची घोडदौड सुरू झाल्यानंतर आर्थिक स्थर्यासाठी धावपळ सुरू होते. कधीतरी पाहिलेली स्वप्न मग मनाच्या कोपऱ्यात दडवून ठेवावी लागतात. असाच अनुभव प्रत्यक्ष जगणारे मान्यवर या अंकात आपल्या आयुष्यातील ‘राहिलेल्या गोष्टी’चा रंजकपट उलगडणार आहेत. यात  स्वप्नातले कॉकपिट सोडून न्यायासनावर बसणारे न्या. विकास सिरपूरकर, राजकारणात पाऊल ठेवल्यानंतर क्रिकेटला रामराम ठोकणारे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, यशवंत मनोहरांच्या स्वप्नातला अस्वस्थ करणारा कुंचला, अंतरीचे गाणे आठवणाऱ्या ज्येष्ठ लेखिका आशा बगे, गांधी विचारांनी प्रेरित तरुणांची फळी जुळलीच नाही, हे सांगणारे बाबासाहेब सरोदे, समाजाचे ऋण फेडण्यासाठी तळमळत असलेले राधेश्याम चांडक, अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा वनातला संघर्ष, गिरीश गांधींचे उर्दूप्रेम, संगीतवेडय़ा प्रभा गणोरकर, अ‍ॅड. फिरदोस मिर्झा यांचे राजकीय आकर्षण, अरुण वरणगावकर यांचे उद्योगातील प्रयोग, रूपा कुळकर्णी-बोधी यांच्या उमेदीचा काळ, सत्यपाल महाराजांची खंजिरी, सुखदेव थोरातांचे चळवळी रूप, वेदप्रकाश मिश्रांचा लेखनसंकल्प, गांधी विचाराधारेच्या संस्करात ‘उमलत्या फुलांचा’ शिक्षक व्हायचे स्वप्न बाळगणारे डॉ. सुगन बरंठ, डॉ. लोकेंद्र सिंग यांचे कवी मन, अ‍ॅड. एकनाथराव साळवे यांची सामाजिक तळमळ, प्रभाकर धाकडे यांचे संगीत, अनाथांच्या आई प्रा. सविता बेदरकर, प्रशासकीय अधिकारांना समाजसेवेशी जोडणारे ई.झेड. खोब्रागडे, देशाला आंतरराष्ट्रीय खेळाडू मिळवून देणारे सीताराम भोतमांगे यांच्या वाचकांसमोर न उलगडलेल्या बाजू विदर्भरंग दिवाळी अंकातून उलगडल्या जाणार आहेत. डॉ. श्रीकांत चोरघडे, कार्तिक शेंडे यांच्या हस्ते प्रकाशन

लोकसत्ता ‘विदर्भरंग दिवाळी अंक २०१९’चे प्रकाशन शुक्रवार, २५ ऑक्टोबरला दुपारी दोन वाजता लोकसत्ता कार्यालयात प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ व लेखक डॉ. श्रीकांत चोरघडे तसेच विठोबा इंडस्ट्रीजचे संचालक कार्तिक शेंडे यांच्या हस्ते होणार आहे.