नागपूर : लंडनमधील युवकाशी इंस्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर त्याने महागडे गिफ्ट पाठविल्याचे आमिष दाखवून गृहिणीची १ लाख १५ हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी अंबाझरी पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

प्रज्ञा (४२) असे फसवणूक झालेल्या गृहिणीचे नाव आहे. त्या गृहिणीचे इन्स्टाग्रामवर खाते होते व एप्रिल महिन्यात तिला डॉ. ऑलिव्हर विलियम्स या नावाने खाते असलेल्या व्यक्तीची ‘फ्रेंड रिक्वेस्ट’ आली. त्याने गृहिणीशी संवाद सुरू केला व लंडनमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ असल्याचा दावा केला. काही दिवसांनी त्यांचे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग सुरू झाले व चांगलीच ओळख झाली. आपली मैत्री झाली असून मी लंडनमधून काही गिफ्ट पाठवत असल्याची त्याने बतावणी केली. त्यात आयफोन, सोन्याचे ब्रेसलेट इत्यादीचा समावेश असल्याचेदेखील त्याने सांगितले. गृहिणीने त्याला गिफ्ट नको, असे सांगितले असतानादेखील त्याने मी पाठविले असून लवकरच माझ्या माणसाचा फोन येईल, असे सांगितले.

हेही वाचा – चंद्रपूर : वाघनखे आणि जगदंबा तलवार परत आणण्यासाठी लंडनस्थित मराठी उद्योजकांशी मुनगंटीवार यांचा संवाद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५ मे रोजी महिलेला जॉन लँबर्ट नावाच्या व्यक्तीचा फोन आला व मुंबई विमानतळावर तुमचे गिफ्ट पोहोचले असून कस्टम क्लिअरन्ससाठी २५ हजार रुपये भरावे लागतील, असे त्याने सांगितले. त्याच्यावर विश्वास ठेवून महिलेने त्याने सांगितलेल्या बँक खात्यावर पैसे पाठविले. काही वेळाने त्याने परत फोन केला व कस्टम्सला आणखी ९० हजार भरावे लागतील. जर पैसे भरले नाही तर कायदेशीर कारवाई होईल, अशी भीती दाखविली. महिलेने ते पैसेदेखील खात्यात टाकले. दुसऱ्या दिवशी त्याने परत फोन करून आणखी दीड लाख रुपये मागितले. आपली फसवणूक होत असल्याचे महिलेच्या लक्षात आले व तिने अंबाझरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी दोन्ही आरोपींविरोधात माहिती तंत्रज्ञान अधिनियमांअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.