नागपूर : पावसाळ्यात खाणींमध्ये पाणी शिरून कोळशाचे उत्पादन कमी होते. त्यामुळे महानिर्मितीकडून या दिवसांत अखंडित वीजनिर्मितीसाठी सर्व प्रकल्पांत कोळशाचा साठा वाढवला जातो. परंतु जून २०२४ च्या तुलनेत १ जून- २०२५ रोजीच्या नोंदीनुसार, महानिर्मितीकडे कोळशाचा साठा कमी आहे. त्यामुळे पावसाळ्यात अतिरिक्त वीजनिर्मिती करावी लागली तर कोळसा टंचाई भासून वीजनिर्मितीवर परिणामाची भीती आहे.
महानिर्मितीची वीजनिर्मितीची स्थापित क्षमता १३,८८०.५५ मेगावॅट आहे. यामध्ये औष्णिक विद्युत प्रकल्पाचा वाटा जवळपास ७३.५ टक्के म्हणजे १० हजार २०० मेगावॅट आहे. या प्रकल्पात वीजनिर्मितीसाठी नियमित कोळशाची गरज भासते. पावसाळ्यात खाणींमध्ये पाणी शिरून कोळशाचे उत्पादन कमी होते. त्यामुळे वेकोलिसह इतर कोल कंपन्यांकडून अतिरिक्त कोळशाचे उत्पादन केले जाते.
दरम्यान, कोल कंपन्यांकडून अतिरिक्त कोळशाचा साठा केला जातो व संबंधित औष्णिक वीजनिर्मिती कंपनीकडे मागणीनुसार तो उपलब्ध केला जातो. १ जून २०२४ मध्ये महानिर्मितीच्या सर्व औष्णिक विद्युत प्रकल्पांकडे कोळशाचा साठा २५.५९ लाख मेट्रिक टन होता. हा साठा १ जून २०२५ मध्ये २४.८५ लाख मेट्रिक टन इतका नोंदवला गेला. त्यामुळे मागील वर्षीहून साठा वाढण्याऐवजी कमी झालेला दिसत आहे. या आकडेवारीला महानिर्मितीचे जनसंपर्क अधिकारी संतोष पुरोहित यांनी दुजोरा दिला. हा साठा आणखी वाढवत पावसाळ्यातील आवश्यक नियोजन वरिष्ठ पातळीवर केल्याने वीजनिर्मितीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा एका दुसऱ्या अधिकाऱ्याने नाव न टाकण्याच्या अटीवर केला.
वर्षनिहाय कोळसा साठा
१ जून रोजीची स्थिती
(टिप- आकडेवारी लक्ष मेट्रिक टनमध्ये)
वर्ष — साठा
२०२१ ११.११ – लाख मेट्रिक टन
२०२२ ७.४० – लाख मेट्रिक टन
२०२३ १४.६८ – लाख मेट्रिक टन
२०२४ २५.५९ – लाख मेट्रिक टन
२०२५ २४.८४ – लाख मेट्रिक टन
वीज निर्मिती करणाऱ्या महानिर्मिती कंपनीबाबत
महानिर्मिती भारतातील सर्व राज्य वीज निर्मिती, सोयी सुविधामध्ये सर्वाधिक एकूण उत्पादन क्षमता आणि सर्वोच्च औष्णिक विद्युत स्थापित क्षमता असलेली संस्था आहे. स्थापित क्षमतेच्या बाबतीत, एन. टी. पी. सी. नंतर ही दुसरी सर्वोच्च राज्य मालकीची निर्मिती कंपनी आहे. त्याची स्थापना महाराष्ट्र सरकारने केंद्रीय वीज अधिनियम- २००३ अंतर्गत वीज निर्मीतीच्या व्यवसायात सहभागी होण्याच्या मुख्य उद्देशाने केली आणि महानिर्मिती राज्यातील ग्राहकांसाठी सर्वात स्वस्त वीज उत्पादन करते, असे महानिर्मितीचा दावा आहे.