अकोला : राज्यातील कृषी विद्यापीठांमध्ये रिक्त पदाचा मोठा डोंगर निर्माण झाला आहे.मनुष्यबळ अभावी कृषी विद्यापीठांचे कामकाज चांगलेच प्रभावित झाले. या सर्व पार्श्वभूमीवर विविध कृषी विद्यापीठांमधील रिक्त पदे भरण्यासाठी त्यासंबंधीचा आकृतिबंध येत्या १५ दिवसांत मंजूर करून पुढील कार्यवाही करण्यात येईल. विद्यापीठांत आवश्यक वसतिगृहांसाठी, तसेच पायाभूत सुविधांसाठी निधी मिळवून दिला जाणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी आज येथे दिली.

राज्यातील चारही कृषी विद्यापीठांमध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त पदे आहेत. त्याची पदभरती गेल्या अनेक वर्षांपासून रखडली आहे. रिक्त पदाचा परिणाम कृषी विद्यापीठाच्या संशोधन, शिक्षण, विस्तार कार्यासह बीज उत्पादनावर होत असल्याचे चित्र राज्यात निर्माण झाले. त्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व कृषी विद्यापीठाच्या कुलगुरू व अधिकाऱ्यांची आढावा बैठक डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या सभागृहात कृषिमंत्र्यांच्या अध्यक्षतेत झाली. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख, परभणी येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. इंद्र मणी यांच्यासह विविध विद्यापीठांचे अधिकारी उपस्थित होते. कृषिमंत्र्यांनी विद्यापीठातील सर्वच विभागांचा आढावा घेतला.

बैठकीत विद्यापीठांचे कुलगुरू व अधिकाऱ्यांकडून कृषिमंत्र्यांनी विद्यापीठांचे कार्यक्षेत्र, उपक्रम, अडचणी आदींबाबत माहिती जाणून घेतली. पदभरती, पायाभूत सुविधा, वसतिगृह आदी मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. हवामान बदलाचे जगावर मोठे संकट आहे. अचानक अतिवृष्टी सारख्या संकटाने शेती व पिकांचे अतोनात नुकसान होते. बदलत्या स्थितीतील संकटावर मात करून शेती उत्पादन व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी नवनवे प्रयोग व संशोधन करणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न व समस्या सोडविण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रयत्न करावे, असे निर्देश कृषिमंत्र्यांनी दिले आहेत.

कृषिमंत्र्यांकडून ११०० एकरावरील बीज प्रक्रिया प्रकल्पाची पाहणी

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या वणी रंभापुर येथील कृषी क्षेत्राची पाहणी केली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्यासह अधिकारी व विद्यापीठातील प्राध्यापक, संशोधक आदी उपस्थित होते. वणी रंभापुर येथे विद्यापीठाचे सर्वात मोठे बीज उत्पादन प्रक्षेत्र आहे. त्या ठिकाणी एक हजार १०० एकरावर बीज उत्पादन प्रकल्प आहे. त्याची पाहणी करून कृषिमंत्र्यांनी प्रत्येक घटकाची माहिती जाणून घेतली. तेथील संशोधन व प्रयोगांचे त्यांनी कौतुक केले. यावेळी कृषी विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.