Maharashtra Assembly Winter Session 2022 Live Updates, Day 8 : हिवाळी अधिवेशनाचा दुसरा आठवडा आज ( २६ नोव्हेंबर ) सुरु होणार आहे. दिशा सालियन प्रकरणावरून शिंदे गट आणि भाजपाने शिवसेना आमदार आदित्य ठाकरेंना घेरलं आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत नागपूरात दाखल झाले आहे. तसेच, महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं निलंबन यावरूनही दोन्ही सभागृहात गदारोळ होण्याची शक्यता आहे.
Assembly Winter Session 2022 Live Updates, 26 December 2022 : आज पुन्हा विरोधक आणि सत्ताधारी आमने-सामने येण्याची शक्यता
कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा तसंच गायरान जमीन एका व्यक्तीला विकल्याचा आरोप करत अजित पवारांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं आहे. अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घेत मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी अशी मागणी अजित पवारांनी केली आहे. दरम्यान अजित पवारांच्या या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिलं आहे. एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर असून त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
काँग्रेस नेते, माजी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात आज ( २६ नोव्हेंबर ) पहाटे सेमिनरी हिल्स परिसरात मॉर्निंग वॉक करण्यासाठी गेले होते. तेव्हा, बाळासाहेब थोरात पाय घसरून पडले. यामध्ये त्यांच्या हाताचे हाड मोडलं आहे. त्यांना इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) येथे दाखल करण्यात आलं आहे. तेथे सर्व तपासण्या झाल्यानंतर त्यांना मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती नातेवाईकांकडून देण्यात आली.
विधानसभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. अब्दुल सत्तार यांनी सिल्लोड कृषी प्रदर्शनासाठी बेकायदेशीर निधी गोळा केल्याचा तसंच गायरान जमीन एका व्यक्तीला विकल्याचा आरोप करत अजित पवारांनी आक्रमक भूमिका घेतली. तसंच त्यांनी सुप्रिया सुळेंना केलेली शिवागीळ आणि जिल्हाधिकाऱ्यांना मद्यप्राशनासाठी दिलेली ऑफर यावर भाष्य करत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना लक्ष्य केलं.
विरोधी पक्षनेते अजित पवारांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. "तत्कालीन राज्यमंत्री असताना अब्दुल सत्तार यांनी वाशिममधील गायरान जमिनीचा ३७ एकरचा घोटाळा केला आहे," अजित पवारांनी म्हटलं आहे.
नागपूर : विधिमंडळ अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याचा पहिल्या दिवशी सोमवारी विरोधकांनी राज्य सरकारचा जोरदार निषेध नोंदवला. ईडी सरकारचा धिक्कार असो, राजीनामा द्या.. राजीनामा द्या मुख्यमंत्री राजीनामा द्या, विदर्भातील संत्र्याला भाव मिळालाच पाहिजे, धानाला बोनस मिळालाच पाहिजे, ‘गली गली में शोर है.. खोके सरकार चोर है’ अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. बातमी वाचा सविस्तर
“या मुख्यमंत्र्याला, उपमुख्यमंत्र्याला मान खाली घालावी लावेल अशी कोणाच्या बापाची हिंमत नाही. जसं ते म्हणतात तसं आपणही इंच इंच लढू. केंद्रात, सर्वोच्च न्यायालयात आपण मराठी बांधवांवरील अन्याय दूर करण्यासाठी हवं ते करु,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“मागील आठवड्यातील वातवारण गंभीर असल्याने ठराव येऊ शकला नाही. आज ठराव येणार होता, पण मुख्यमंत्र्यांना केंद्र सरकारकडून कार्यक्रमाचं निमंत्रण आलं होत. त्यासाठी जाणं महत्त्वाचं होतं. ते दुपारी येणार आहेत. ते आल्यानंतर आज किंवा उद्या ठराव मांडू. यासंदर्भात तसूभरही महाराष्ट्राचं सरकार मागे हटणार नाही,” असं आश्वासन त्यांनी विरोधकांना दिलं.
“सीमाभागात मराठी बांधवांवर अत्याचार होत असून दडपशाहीने वागवंल जात आहे. यापेक्षा महत्त्वाचं काम काय असणार. सरकारने बाकीचं कामकाज बाजूला सारुन मराठी बांधवांवरील अन्यायाला वाचा फोडावी आणि संपूर्ण महाराष्ट्र मराठी बांधवांच्या पाठीशी आहे हे कर्नाटकला दाखवलं पाहिजे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना बोलावून घेतलं आणि संयम पाळण्यास सांगितलं होतं. पण आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री मान खाली घालून गप्प आहेत. कर्नाटकचे मुख्यमंत्री वाटेल ते बोलतात, हे आपण उघङड्या डोळ्याने पाहायचं का?,” अशी विचारणा भास्कर जाधव यांनी केली.
“महाराष्ट्र शासनानं हा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात २००४ साली दाखल केला आहे. कर्नाटकचा त्यावर प्रतिदावा आहे. राजकीय दृष्टीने वादग्रस्त वक्तव्यं करुन प्रकरण चिघळण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. गृहमंत्र्यांकडे हा विषय न्यावा अशी माझी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना विनंती आहे. जाणुनबुजून परिस्थिती चिघळण्याचा प्रयत्न सुरु आहे. आपण फक्त बघ्याची भूमिका घेता कामा नये. सर्व मराठी भाषिक आपल्याकडे आशेने पाहत आहेत. बघ्याची भूमिका घेऊन आपण त्याला काही उत्तर देत नाही हे बरोबर नाही. कर्नाटकला गंभीर इशारा दिला पाहिजे,” अशी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे.
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेला डिवचण्याचा प्रयत्न केला आहे. आज ठरावा यायला हवा होता. ते आपल्याला डिवचतात आणि आपण शांत बसतो. आपणही त्यांना जशास तसं उत्तर दिलं पाहिजे असं सर्वांचं मत आहे. सर्व मराठी भाषिकांना ही भूमिका समजली पाहिजे. आम्ही सातत्याने भूमिका मांडत असताना त्याला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे असं अजित पवार म्हणाले आहेत.
सीमावादार शिंदे-भाजपा सरकारच्या काळात निर्णय होईल. सीमावादावर बोलण्याचा अधिकार फक्त एकनाथ शिंदे यांना आहे. सीमाप्रश्नी तुम्ही लाठ्या-काठ्या खाल्ल्या का?, असा सवाल प्रवीण दरेकरांनी उद्धव ठाकरेंना विचारला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यावरून सवाल उपस्थित केला आहे. "दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सीमावादाचा प्रश्न उपस्थित करणार आहेत का?," असं उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेमध्ये म्हटलं आहे.
कर्नाटक-महाराष्ट्र सीमाप्रश्नावरुन शिवसेना-राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर घोषणाबाजी सुरु केली आहे. कर्नाकटचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई, शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे. तसेच, 'खाऊन खाऊन ५० खोके माजलेत बोके', 'निर्लज्ज सरकार, मिंधे सरकार', 'बोम्मईसमोर माना खाली घालणाऱ्या सरकार हाय हाय', अशी घोषणा विरोधकांनी दिल्या आहेत.
हिवाळी अधिवेशनातील घमासानाकडे राज्याचं लक्ष