अकोला : जिल्ह्यात सिंचन व्यवस्थेचे सक्षमीकरण होणार आहे. जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील घोंगा व कानडी लघुपाटबंधारे योजनेच्या दुरुस्तीसाठीच्या खर्चाच्या तरतुदीस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. घोंगासाठी ४ कोटी ७६ लाख, तर कानडीसाठी ४ कोटी ९२ लाख रुपयांची तरतूद करण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या दुरुस्तीतून ९१ हेक्टर सिंचन व्यवस्था निर्माण होणार आहे.

जिल्ह्यात सिंचन अनुशेष आहे. तो भरून काढण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत. सिंचन व्यवस्थेत वाढ करण्याची आवश्यकता दिसून येते. अनेक जुने प्रकल्प चांगल्या स्थितीत असतांनाही दुरुस्ती अभावी त्यात सिंचन होत नाही. त्यापैकीच मूर्तिजापूर तालुक्यातील घोंगा आणि कानडी लघुपाटबंधारे प्रकल्प. ते नादुरुस्त असल्याने सिंचन होत नव्हते.

तालुक्यातील सिंचन सुविधेत वाढ होऊन शेतकऱ्यांना त्याचा लाभ होण्यासाठी आमदार हरीश पिंपळे यांनी घोंगा आणि कानडी लघुप्रकल्पाच्या दुरुस्तीची मागणी शासनाकडे केली होती. त्याची दखल घेऊन आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत दोन्ही प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठी निधीला मान्यता देण्यात आली आहे.

मूर्तिजापूर तालुक्यात घोंगा लघुपाटबंधारे योजनेचे काम १९८६ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. तर कानडी लघुपाटबंधारे योजनेचे काम १९७७ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे होते. या दोन्ही प्रकल्पाच्या ‘पिचिंग’ ना-दुरुस्त झाल्याने सिंचनात अडथळा येत होता. शिवाय कालव्यामध्ये झाडेझुडपे वाढली आहेत, प्रकल्पावरील सेवारस्ता नादुरुस्त झाला. त्यासाठी या दोन्ही प्रकल्पांच्या दुरुस्तीसाठी निधी देण्याची मागणी करण्यात आली. विशेष बाब म्हणून दोन्ही प्रकल्पाच्या दुरुस्ती खर्चास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार घोंगा प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठीचार कोटी ७६ लाख ५५ हजार ३०० रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली.

या दुरुस्तीमुळे ३५ स.घ.मी. पाणीसाठा आणि ४५ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पाचा मूळ पाणी साठा १५५० स.घ.मी. आणि मूळ सिंचन क्षमता ३५० हेक्टर आहे. कानडी प्रकल्पाच्या दुरुस्तीसाठीच्या चार कोटी ९२ लाख ३२ हजार ९८६ रुपयांच्या तरतुदीस मंजुरी देण्यात आली. या प्रकल्पाच्या दुरुस्तीमुळे ३८ स.घ.मी. पाणी साठा आणि ४६ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होणार आहे. या प्रकल्पाचा मूळ पाणी साठा १७०० स.घ.मी. आणि मूळ सिंचन क्षमता २८६ हेक्टर आहे. सिंचन क्षेत्रात वाढ होणार असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल.