नागपूर: अनुकंपा तत्वावरील व लिपिक श्रेणीतील १० हजार ३०९ उमेदवारांना नियुक्तीपत्र वितरणाचा कार्यक्रम राज्याच्या विविध जिल्ह्यांमध्ये घेण्यात आला यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पुन्हा मेगाभरतीची घोषणा केली. तसेच महाराष्ट्र लोकसेवा आयोगासंदर्भात एक महत्त्वपूर्ण विधान केले. त्यामुळे एमपीएससीच्या कार्यप्रणालीमध्ये लवकरच मोठा बदल दिसून येण्याची शक्यता आहे.

राज्यातील महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांचे वेळापत्रक अनियमित आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी करतात. मात्र, आयोगाच्या लालफिती कारभारामुळे हजारो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सक्षम बनवावे, अशी मागणी अनेक वर्षांपासून होत आहे.

यावर नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘एमपीएससी’ला सक्षम करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच राज्यातील विविध सरळसेवा भरती परीक्षा या सुद्धा एमपीएससीमार्फत घेण्याचा निर्णय झालेला आहे. मात्र यानंतरही एमपीएससीच्या कार्याला गती येत नसल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजी पाहायला मिळते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी विविध स्पर्धा परीक्षांसाठी नियुक्ती झालेल्या उमेदवारांना प्रमाणपत्र देताना एमपीएससीला बळकट करण्याची पुन्हा एकदा घोषणा केलेली आहे.

रिक्त पदांवर भरती होणार

राज्यात पारदर्शक पद्धतीने ४० हजार पोलिसांसह सुमारे एक लाख नोकरभरती करण्यात आली. प्रत्येक संवर्गातील पदे आणि त्यांच्या जबाबदाऱ्यांमध्ये कालानुरूप मोठ्या प्रमाणात बदल झालेला आहे, हे लक्षात घेऊन राज्यातील सर्व संवर्गातील पदांच्या सेवा प्रवेश नियमात सुधारणा करण्यात येणार असून त्यानंतर पुढील वर्षी विविध विभातील रिक्त पदे भरण्यासाठी पुन्हा एकदा महाभरती करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर ही घोषणा युवक वर्गाला आकर्षित करणारी ठरणार आहे.

नेमके काय म्हणाले मुख्यमंत्री

यापूर्वीच्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एमपीएससीची सदस्य संख्या वाढवण्यासह विविध कर्मचारी भरतीला हिरवी झेंडी दिली होती. त्यानंतर शनिवारी पुन्हा फडणवीस यांनी याचा पुनरुचार केला. ते म्हणाले, एमपीएससीची भरती प्रक्रिया जास्तीत जास्त गतिमान कशी होईल, यासाठी सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव व्ही राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीच्या कार्यप्रणालीमध्ये लवकरच मोठा बदल होणार आहे. तसेच विविध परीक्षा आणि निकालाला गती येण्याची शक्यता आहे.