Crime Investigation Department नागपूर : राज्यात दर मिनिटाला दोन दखलपात्र गुन्हे दाखल होत असून २०२५ मध्ये आतापर्यंत एकूण ४ लाख ९० हजारांहून अधिक गुन्ह्य़ांची नोंद झाली आहे. राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून ही आकडेवारी समोर आली आहे.

राज्य गुन्हे अन्वेषण विभागाने केलेल्या नोंदीनुसार, महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्येही अंशतः वाढ झाली आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत राज्यात भारतीय न्याय संहिता कलमाखाली २ लाख ३२ हजारांहून अधिक तर भारतीय दंड संहिता कलमाखाली २ लाख ५९ हजार १५२ असे एकूण ४ लाख ९० हजारांहून अधिक गुन्ह्यांची नोंद करण्यात आली. राज्यात एकूण दाखल गुन्ह्यांपैकी ३९.६७ टक्के गुन्हे पोलीस आयुक्तालयांतर्गत असून त्यापैकी ३८.१६ टक्के गुन्हे एकट्या मुंबईत घडले आहेत.विदर्भात सर्वांत मोठा जिल्हा असलेल्या यवतमाळमध्ये १२ हजारांहून अधिक सराईत गुन्हेगारांची नोंद घेण्यात आली आहे.

नागपुरात आठ महिन्यांत दीड लाखावर गुन्हे

नागपूरच्या ग्रामीण भागात नव्याने निर्मित मोहपा, पाचगाव आणि वडोदासह २५ पोलीस ठाणे आहेत. त्या सर्व ठाण्यांत मिळून आठ महिन्यांत दीड लाखाहून अधिक गुन्ह्यांची नोंद घेण्यात आली आहे.

देहव्यापारातही नागपूर अव्वल

देहव्यापाराच्या प्रकरणांमध्ये २०१५ ते २०२५ या दहा वर्षांच्या काळात ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. मात्र, नागपूर शहरात सर्वाधिक ४३८ देहव्यापाराचे गुन्हे नोंदवण्यात आले. स्पा, ब्युटी पार्लर, मसाज सेंटर्स, ओयो हॉटेलमध्ये सर्रास देहव्यापार सुरू असल्याचे सामाजिक सुरक्षा पथकाकडून होत असलेल्या प्रतिबंधात्मक कारवायांवरून समोर आले आहे.

मुंबई उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्तीद्वय मोहित शहा आणि एम.एस. सौनक यांनी २०१४ मध्ये महिलांवरील अत्याचार, कौटुंबिक हिंसा आणि बालकांवरील अत्याचाराचे ५६ हजार खटले प्रलंबित असल्याने १७९ द्रूतगती न्यायालयांची निर्मिती करण्याचे आदेश दिले होते. सध्या प्रलंबित खटल्यांची संख्या २ लाख ५० हजारांच्या वर आहे. ते निकाली काढण्यासाठी ४५० न्यायालयांची गरज आहे. महिला अत्याचार खटल्यांसाठी केवळ ३ आणि बालकांसाठी १ न्यायालय आहे. आरोपींना शिक्षा होत नसल्याने न्यायदानात विलंब होत आहे.- विहार दुर्वे, माहिती अधिकार कार्यकर्ते, मुंबई.

कायद्यात केलेल्या सुधारणांमुळे पोलिसांच्या अधिकारक्षेत्रात वाढ झाली आहे. त्यामुळे प्रतिबंधात्मक कारवायांमधील गुन्ह्यांच्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसत आहे. परंतु खून, प्राणघातक हल्ले, महिला अत्याचार, दरोड्यासारख्या गंभीर गुन्ह्यात घट नोंदवली गेली आहे.- नवीनचंद्र रेड्डी, सहपोलीस आयुक्त, नागपूर.