नागपूर : प्रत्येक युवक-युवतींना शिक्षणानुरूप रोजगाराच्या संधी मिळाव्यात यासाठी युवक-युवती आणि त्यांचे पालक जागरूक असतात. राज्य शासन देखील त्यांच्या रोजगार निर्मितीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करीत असते. युवा वर्गाचे शिक्षण पूर्ण झाल्यांनतर वेळेत योग्य मार्गदर्शन आणि व्यवसाय करणाऱ्यांसाठी भांडवल उपलब्धता शासन विविध योजनांच्या माध्यमातून करून देत आहे. रोजगार इच्छुक युवक-युवती आणि रोजगार देणाऱ्या विविध आस्थापना यांच्यामध्ये संवाद आणि समन्वय साधून उद्योग क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि युवा वर्गाला रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र शासनाने ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ सुरू केली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ही योजना सुरू करण्यात आली होती.

मात्र काही महिने प्रशिक्षणानंतर युवा कार्य प्रशिक्षणार्थींचे काम बंद करण्यात आले. त्या विरोधात आता प्रशिक्षणार्थीने आंदोलनाचा पवित्र घेतलेला आहे. सरकार आम्हाला कायमस्वरूपी करणार नसेल आणि पुढे काम देणार नसेल तर येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये सरकारला सत्तेतून खाली खेचू, असा इशारा युवकांनी दिलेला आहे. नागपूरच्या संविधान चौकामध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाराष्ट्रातून जवळपास पाच हजारावर विद्यार्थी उपस्थित झाले होते.

आंदोलकांच्या निवेदनानुसार, विधानसभा निवडणुकीच्या अगोदर लाडकी बहीण खुश केल्यानंतर लाडक्या भावाचे काय हा प्रश्न जेव्हा उपस्थित केला गेला. तेव्हा लाडक्या भावाला आम्ही वाऱ्यावर सोडणार नाही अशा प्रकारची घोषणा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी केली आणि मुख्यमंत्री युवा कार्यप्रशिक्षण योजना घोषित करून दहा लाख तरुणांना प्रतिवर्षी कौशल्य विभागांतर्गत शासकीय आस्थापनेमध्ये प्रशिक्षण देऊन त्याच आस्थापनेमध्ये कायम करू अशा प्रकारची घोषणा केली होती.

या घोषणेनंतर राज्यातील इतर क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या तरुणांनी आपली नोकरी सोडून शासकीय नौकरी मिळत आहे. या अपेक्षेपोटी राज्यातील विविध आस्थापनामध्ये एक लाख ३४ हजार तरुणांनी आवेदन केले आणि प्रशिक्षण पूर्ण केले. राज्य सरकार या लाडक्या भावाला प्रशिक्षणार्थ्यांना ११ महिन्याचे प्रमाणपत्र देणार आहे. हे प्रमाणपत्र घेऊन कुठे जायचं हे मात्र सांगत नाहीत. कारण या प्रमाणपत्राला कुठेही किंमत नाही. मुंबई येथील आझाद मैदानामध्ये चार महिने झाले. विविध आंदोलन झाले पण राज्य सरकार काही याकडे सहानुभूतीपूर्वक पाहत असल्याचे दिसत नाही. याचा निषेध म्हणून २५ऑगस्टला आंदोलन करण्यात आले.

आंदोलनातील मागण्या

एक लाख ३४ हजार प्रशिक्षणार्थ्यांना नियमित कायमस्वरुपी रोजगार मिळालाच पाहिजे.

प्रशिक्षणार्थ्यांना मानधनात दुप्पट वाढ झालीच पाहिजे.

वयोमर्यादा ज्या दिवशी प्रशिक्षणार्थी प्रशिक्षण घेण्यासाठी जॉईन झाला त्या दिवशीपासून मोजदाद झाली पाहिजे.

या प्रमुख मागण्याकरिता मुंबईमध्ये यापूर्वी अनेक मोठे मोठे आंदोलन करण्यात आलेले आहेत. जिल्हा पातळीवर, तालुका पातळीवर अनेक आंदोलन करून सुद्धा राज्य सरकार राज्यातील बेटोजगारी संदर्भात बोलण्यास तयार नाही. राज्यातल्या बेटोजगाराला वाऱ्यावर सोडण्याचा प्रकार आम्ही सहन करणार नसून राज्य सरकारला राज्यातील बेरोजगारांना रोजगार द्यावाच लागेल जोपर्यंत बेरोजगारांना दोजगार मिळणार नाही तोपर्यंत मी स्वस्थ बसणार नाही असे लोकनेते बालाजी पाटील चाकूरकर यांनी सांगितले आहे