नागपूर : जूनअखेरीस राज्यात मोसमी पावसाने जोर धरला असून हा पाऊस आता राज्यभर कोसळत आहे. मोसमी पावसाचे वारे दाखल झाले तरी विदर्भाकडे मोसमी पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, बुधवारपासून हा पाऊस आभाळ फाटल्यागत कोसळत आहे. दरम्यान, आजपासून तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.
कोकण, मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्रात जून महिन्याच्या पूर्वार्धापासूनच पावसाने हजेरी लावली होती. मात्र, त्याचवेळी दुसरीकडे विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशात पावसाने दडी मारली होती. बुधवारी रात्रीपासून हवामानात मोठा बदल झाला असून, या भागात जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे. विदर्भातील अनेक जिल्ह्यांत रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे नद्या-नाले भरून वाहू लागले आहेत. काही नद्यांना पूर येऊन काही गावांचा संपर्क तुटला आहे.
बुलढाणा जिल्ह्यात मेहकर आणि लोणार तालुक्यात ढगफुटीसदृश्य पाऊस कोसळला. वाशिम, अकोला जिल्ह्यातही पावसाने कहर केला. तर वर्धा जिल्ह्यात मान्सूनच्या पहिल्याच पावसाने दोन बळी घेतले. मात्र, उशिरा आलेल्या मोसमी पावसाने शेतकऱ्यांचे शेती हंगाम सुरू होण्यापूर्वीच नुकसान केले. ज्या शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या होत्या, त्या मुसळधार पावसामुळे वाहून गेल्या. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली असून, आता हवामानात उष्णतेची चाहूल लागली आहे. शहरात दिवसभर कधी ऊन तर कधी ढगाळ असे वातावरण आहे. कमाल तापमानात वाढ झाल्याने उकाडाही जाणवू लागला आहे. दरम्यान, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार विदर्भात आजपासून पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार, मुंबई व परिसरात शुक्रवारी, २७ जून रोजी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवली आहे. मुंबई शहरासह ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि इतर उपनगरीय भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इशारा कुठे कुठे
महाराष्ट्रात आजपासून पुढील चार दिवसांपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार आहे. हवामान खात्याने राज्यातील विविध भागांसाठी यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. २६ ते ३० जून दरम्यान काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असून, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये २७ ते ३० जून या कालावधीत विशेष सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे. या भागांत वीजांचा कडकडाट, जोरदार वादळी वारे आणि अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
२९ जूनपर्यंत अकोला, अमरावती, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांतही वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये यलो अलर्ट देण्यात आला आहे. पुणे शहरात पुढील चार दिवस हलक्या स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता असून, घाटमाथ्यांवर मात्र अतिवृष्टीचा धोका वर्तवण्यात आला आहे. कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्येही हवामान विभागाने अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.