नागपूर: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) ताफ्यात लवकरच स्मार्ट ई- बसेस दाखल होणार आहे. या बसमध्ये नाविन्यपूर्ण सुविधा प्रवाशांना मिळणार आहे.

एसटीची स्मार्ट ई- बस ए. आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणालीने सज्ज असेल. राज्य शासनाचे ई- वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण एसटी महामंडळाने देखील अंगीकारले असून भविष्यात घेण्यात येणाऱ्या स्वमालकीच्या ५ हजार बसेस पैकी दरवर्षी किमान १ हजार बसेस या ई- बसेस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात, या ई-बसेस देखील ए. आय. तंत्रज्ञानावर आधारित एकात्मिक सुरक्षा प्रणाली बसवलेल्या असाव्यात अशा सूचना संबंधित बस तयार करणाऱ्या कंपनीला आम्ही सांगितले आहे. त्यानुसार त्यांनी उत्तर प्रदेश परिवहन महामंडळासाठी तयार केलेल्या स्मार्ट ई-बसचे सादरीकरण केले नव्या ई-बसमध्ये चालकांच्या हालचालींवर लक्ष ठेवणारे ए.आय. तंत्रज्ञानावर आधारित सी. सी. टी. व्ही. कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. गाडी चालवताना जर चालक जांभया देत असेल किंवा मोबाईल वापरत असेल तर सदर कॅमेरे प्रवाशांना याबाबत सतर्क करतील तशा प्रकारचा धोक्याचा अलार्म देखील वाजवला जाईल, अशी यंत्रणा नव्या स्मार्ट ई- बसेस मध्ये असणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता लक्षात घेता प्रवाशांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी देखील बसमध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहेत. बसला अचानक आग लागल्यास ती आग अल्पावधीत विझवण्यासाठी फोम बेस अग्नीशामक यंत्रणा बसमध्ये राहावी म्हणून परिवहन मंत्री कार्यालय प्रयत्न करणार आहे. याबरोबरच स्वारगेटच्या घटनेनंतर बंद बस ही कोणत्याही बाह्य हस्तक्षेपामुळे उघडली जाणार नाही. तसा प्रयत्न केल्यास धोक्याचा अलार्म वाजेल अशी यंत्रणा देखील नव्या स्मार्ट ई- बसमध्ये बसविण्यात येणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी प्रसिद्धीपत्रकारून सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एसटी महामंडळात जुन्या बसेस…

एसटी महामंडळाच्या १५ हजार ८०० बसेस सध्या धावत आहेत. मात्र, यापैकी अनेक बस खिळखिळ्या झाल्या असून या बसमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एसटीने नवीन डिझेल बस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यापैकी बऱ्याच बस टप्याटप्यात एसटीत दाखल होत आहे. या नव्या बस ग्रामीण भागातील वाहतुकीसाठी फायदेशीर ठरेल, असा आशावाद व्यक्त करण्यात आला आहे. त्यात आता स्मार्ट ई- बसची भर पडणार आहे.