नागपूर : बिबट्यांची वाढती संख्या आणि हल्ले रोखण्यासाठी बिबट जेरबंद करणे, त्यांची नसबंदी करणे हा पर्याय नाही. भविष्यात बिबट्यांची संख्या कमी करण्यासाठी वनखात्याला गांभीर्याने विचार करावा लागेल. यावर शास्त्रीय अभ्यास तसेच संशोधन होणे आवश्यक असून निश्चित धोरणांची गरज असल्याचे मत वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.
साखर कारखान्यांमुळे उस लागवडीचे क्षेत्र वाढले असून गेल्या दोन दशकांपासून बिबट उसाच्या मळ्यातच यशस्वी प्रजनन करत आहे. बिबट्याच्या जवळपास तीन ते चार पिढ्या याच उसाच्या मळ्यात जन्माला आल्या आहे. त्यांच्या मेंदूतही जनुकीय बदल झाले आहे. त्यामुळे जन्माला येणाऱ्या बिबट्याच्या बछड्याला देखील तोच त्याचा सुरक्षित अधिवास वाटत आहे. प्रतिकूल परिस्थितीत जुळवून घेणाऱ्या बिबट्याने आता बेडूक, उंदीर, घुशी, खेकडा हे देखील त्याचे खाद्या म्हणून स्वीकारले आहे. महाराष्ट्रात जुन्नर खालोखाल सर्वाधिक बिबट्यांची संख्या सातारा जिल्ह्यात कराड, पाटण तालुक्यात आहे. २००१-२००२ मध्ये जुन्नर विभागात सुमारे ११ जणांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला, तर २५ जण जखमी झाले. १०८ बिबट त्यावेळी बंदिस्त करण्यात आले. त्यातील काही माणिकडोह बिबट निवारण केंद्र व संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात बंदिस्त करण्यात आले. तर १६ बिबट चांदोली अभयारण्यात सोडण्यात आले. त्यांच्या शेपटीला एक विशिष्ट प्रकारची ‘मायक्रोचिप’ लावण्यात आली. त्यावरून ते पुन्हा जुन्नरमध्ये परत गेल्याचे सिद्ध झाले.
कायद्यात बदल गरजेचा
पश्चिम महाराष्ट्रातील मानव-वन्यजीव संघर्षावर पर्याय म्हणून वनखात्याने १५०० बिबट्यांना पकडून ‘वनतारा’त पाठवण्याचा प्रस्ताव केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवला. मात्र, वन्यजीव (संरक्षण) कायदा, १९७२ च्या अनुसूची एक अंतर्गत बिबट्यांना संरक्षण दिले आहे. त्यामुळे कारणाशिवाय बिबट्याला जेरबंद करता येत नाही. संघर्षाच्या स्थितीतच बिबट्याला जेरबंद करण्याची परवानगी प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्याकडून दिली जाते. त्यामुळे १५०० बिबट्यांना पकडण्याची परवानगी कशी देणार, हाही प्रश्न आहे. बिबट्यांच्या नसबंदीचा प्रस्ताव वनखात्याने केंद्राकडे पाठवला आहे. या दोन्हीच्या परवानगीसाठी वन्यजीव संरक्षण कायद्यात बदल करावा लागणार आहे.
बिबट्याला ‘रेडिओ कॉलर’ लावून उपयोगाचे नाही. तर बिबट्याच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी शास्त्रीय अभ्यास व संशोधन गरजेचे आहे. हा अभ्यास करताना जिल्ह्याची बिबट धारण क्षमता किती यावर देखील अभ्यास आवश्यक आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून बिबट गावात किंवा घराजवळ आला तर ‘अलार्म’ वाजला पाहिजे.
-रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक, सातारा
