अमरावती : राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून सर्वदूर होत असलेल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई ते नागपूर मार्गावर रेल्वेसेवा अजूनही सुरळीत होऊ शकली नाही. बुधवारी सकाळी ११ एक्स्प्रेस तब्बल ६ ते ८ तास उशिरा धावत होत्या. मुंबई-नागपूर सेवाग्राम एक्स्प्रेस काल रद्द करण्यात आली. मुंबई-अमरावती एक्स्प्रेसला तब्बल ६ तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले.

बुधवारी सकाळी मुंबईकडून येणाऱ्या गाड्या कमालीच्या विलंबाने धावत होत्या. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागता. सर्वच रेल्वेगाड्या उशिराने धावत असल्याने या गाड्यांमधून रोज ये-जा करणाऱ्या व्यापारी, उद्योजक, चाकरमान्यांना मोठा फटका बसला आहे. सकाळपासून विदर्भातील अनेक रेल्वेस्थानकांवर प्रवासी मोठ्या प्रमाणात खोळंबून होते.

रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी मुंबई येथून सुटणारी सेवाग्राम एक्स्प्रेस रद्द करण्यात आली. तसेच मंगळवारी अमरावती-मुंबई एक्स्प्रेस ही गाडी नाशिकरोड पर्यंतच गेली. या गाडीचा नाशिक ते मुंबई प्रवास रद्द करण्यात आला. काल निघालेली मुंबई-अमरावती एक्स्प्रेस तब्बल ६ तास उशिराने धावत होती. गेल्या दोन दिवसांपासून पावसामुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. कोणत्या रेल्वेगाड्या वळवण्यात आल्या, रद्द झाल्या याची माहिती प्रवाशांना मिळत नसल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाची स्थिती होती.

सर्वच गाड्यांना विलंब

नागपूरकडे जाणारी १२८५९ गीतांजली एक्स्प्रेस ही दोन तास उशिरा धावत आहे. १२२६१ हावडा एसी दुरांतो ही तब्बल १० तास ४५ मिनिटे विलंबाने धावत आहे. १२१०५ विदर्भ एक्स्प्रेस ५ तास ३३ मिनिटे, १२२८९ नागपूर दुरांतो एक्स्प्रेस ६ तास १९ मिनिटे, १२८०९ मुंबई-हावडा मेल ६ तास ११ मिनिटे, १२८७९ भुवनेश्वर ४ तास ३१ मिनिटे, २२५११ कामाख्या एक्स्प्रेस १३ तास, १२१०१ ज्ञानेश्वरीी ८ तास ५० मिनिटे, १८०२९ शालीमार एक्स्प्रेस दोन तास चार मिनिटे, २२१०९ बल्लारशा एक्स्प्रेस १० तास १४ मिनिटे उशिरा धावत आहे.

प्रवाशांचे हाल

अनेक रेल्वेस्थानकांवर प्रवासी अडकून पडले आहेत. त्यांना रेल्वे प्रशासनाकडून अधिकृत माहिती देण्यात येत नसल्याने ताटकळत बसावे लागत आहे. नेमक्या कोणत्या रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या, याची माहिती प्रसारमाध्यमांपर्यंत पोहचवली गेली नाही. अनेक प्रवाशांचे नियोजन कोलमडून गेले. लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमधून प्रवास करणाऱ्यांना रेल्वे स्थानकांवर गाड्यांची वाट पाहण्याशिवाय पर्याय नव्हता.