नागपूर : देशात २०२३ मध्ये विविध गुन्ह्यांखाली अटक ७८८ आरोपींनी पोलीस कोठडीच्या सुरक्षेला भेदून पलायन केल्याच्या घटना घडल्या. राजस्थानमध्ये आरोपी पलायनाच्या सर्वाधिक ७२ घटना घडल्या आहे. मध्यप्रदेशात ६९ तर पुरोगामी म्हणवून घेणाऱ्या महाराष्ट्रात ६८ घटना घडल्या असल्याची नोंद राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाने (एनसीआरबी) घेतली आहे.

भारतीय तुरुंग प्रशासनाच्या २०२३ च्या अहवालानुसार कच्च्या पक्क्या कैद्यांसाठी महाराष्ट्रात ६४ तुरुंग आहे. त्यापैकी ४२ कार्यरत आहे. याखेरीज प्रत्येक पोलीस ठाण्यात आरोपींच्या चौकशीसाठी स्वतंत्र पोलीस कोठडीची व्यवस्था असते. याच पोलीस कोठडीच्या सुरक्षेला सुरुंग लावत ७८८ आरोपी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाले. पोलीस कोठडीतून आरोपी पलयनाच्या घटनांमध्ये महाराष्ट्र तिसऱ्या स्थानी आहे. महाराष्ट्रात २०२३ मध्ये ६८ आरोपी पोलिसांच्या तावडीतून पळाले. त्या खालोखाल आसाममध्ये ५८, ओडिशातून ४९, हरियाणातून ४८, पंजाबमधून ४५, कर्नाटकातून ४४, केरळमघून ४१ तर तमिळनाडूत ४० आरोपी पोलिसांना चकमा देऊन पळाले.

देशभरातील पोलिस कोठडीतून पळालेल्या एकूण प्रकरणांमध्ये १२३३ पोलिसांना अटक झाली. पोलिस कोठडी पलायनाच्या सर्वाधिक घटना राजस्थानमध्ये घडल्यानंतर ४६१ पोलिसांवर तर महाराष्ट्रात ३१३ पोलिसांवर गुन्हे दाखल झाले. त्या खालोखाल १५५ केरळमध्ये, १३२ आंध्र प्रदेशात, १२६ अरुणांचल, उत्तर प्रदेशात १२१ पोलिसांना अटक करत त्यांच्यापैकी १४२ जणांवर आरोपपपत्र दाखल झाले. पोलीस कोठडीतून आरोपी पळाल्याने महाराष्ट्रात २०९ पोलिसांवर अटकेची कारवाई झाली. यातील १४२ जणांवर आरोपपत्र दाखल झाले.

महाराष्ट्रात १३ जण कोठडीत दगावले

देशभरातल्या विविध पोलीस ठाण्यांच्या कोठडीत ६० आरोपी दगावले. यापैकी महाराष्ट्र आणि गुजरात या दोन राज्यांत प्रत्येक १३ आरोपींचा पोलीस कोठडीत असताना मृत्यू झाला. पंजाब, हरियाणा, जम्मू काश्मीर आणि कर्नाटकात प्रत्येक २ तर आंध्र प्रदेश, राजस्थान, पश्चिम बंगाल, तेलंगणा, हरियाणात प्रत्येक १ आरोपी पोलीस कोठडी दरम्यान दगावला. यातील १४ प्रकरणात न्याय दंडाधिकारी तर २२ प्रकरणात न्यायालयीन चौकशी झाली. यात १० प्रकरणात गुन्हे दाखल करून ३ पोलिसांना अटक आणि तिघांवर आरोपपत्र दाखल झाले. महाराष्ट्रात १० कोठडीत मृत्यू आजारामुळे झाले. गुजरातमध्ये कोठडीत मृत्यू ७ तर आणि ५ आत्महत्येने मृत्यू झाल्याची नोंद आहे.