भंडारा : जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील विद्यार्थिनींना बारावीपर्यंत शिक्षण घेणे अधिक सुलभ व्हावे तसेच विद्यार्थिनींची सुरक्षितता या दृष्टीने राज्य परिवहन महामंडळाने मोठे पाऊल उचलले आहे. मानव विकास कार्यक्रमांतर्गत ‘गाव ते शाळा’ दरम्यान एसटी सेवा उपलब्ध करून देण्यात येत असून, या शालेय बसफेऱ्यांसाठी महिला वाहकांच्या नियुक्तीचे आदेश महाव्यवस्थापकांनी दिले आहेत. या उपाययोजनेमुळे लेकींचा प्रवास आता सुरक्षित आणि आरामदायक होणार आहे.
मात्र भंडारा जिल्ह्यात महाव्यवस्थापकांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसून मानव विकासच्या अनेक बसेसमध्ये अजूनही पुरुष वाहकच कार्यरत असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र महाव्यवस्थापकांचे असे पत्र आमच्याकडे आलेच नाही असे अजब उत्तर भंडारा-गोंदियाच्या विभाग नियंत्रक तनुजा अहिरकर यांनी दिले आहे. जिल्ह्यात भंडारा, साकोली, तुमसर आणि पवनी असे चार आगार आहेत. या चारही आगारातून दररोज हजारो विद्यार्थिनी ‘गाव ते शाळा’ परिवहन सेवा वापरत आहेत.
भंडारा आणि गोंदिया असे दोन जिल्हे मिळून भंडारा विभागात मानव विकासच्या ९१ बसेस आहेत. यात भंडारा ७, तुमसर १४, साकोली २८ आणि पवनी ७ अशा जिल्ह्याच्या ५२ बसेस आहेत. साकोली आगारातील २८ मानव विकासच्या बसेस मध्ये तिरोडा आणि भंडाऱ्यातील बसेसचाही समावेश आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात एकूण १२३ महिला वाहक आहेत, यात भंडारा- ३९, साकोली- २१ तुमसर -२० पवनी- ७ अशा एकूण ८७ महिला वाहक भंडारा जिल्ह्यात कार्यरत आहेत. असे असताना मानव विकासच्या बसेसमध्ये अजूनही पुरुष वाहक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेबाबत पालकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
आगारातून शालेय विद्यार्थिनींसाठी एसटी महामंडळाच्या विविध योजना असून जिल्ह्यात हजारो विद्यार्थिनी या योजनेअंतर्गत प्रवास करीत आहेत. या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे. आधी गावातून शाळेपर्यंत मुलींना प्रवास करताना अनेकदा गर्दी, यांचाही सामना करावा लागत होता. मात्र आता महिला वाहक असल्याने ही समस्या कमी होण्याची अपेक्षा आहे.
मुलींसाठी बससेवा कधीपासून ?
मानव विकास कार्यक्रमांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थिनींसाठी एसटीची गाव ते शाळा बससेवा मागील महिन्यापासून सुरू करण्यात आली आहे. ही सेवा विशेषतः बारावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या मुलींच्या गरजेनुसार आहे.
महिला वाहकांच्या नियुक्तीचे निर्देश…
राज्य परिवहन महामंडळाच्या महाव्यवस्थापकांनी निर्देश दिले आहेत की, शालेय बसफेऱ्यांसाठी महिला कंडक्टरची नियुक्ती करण्यास प्राधान्य द्यावे. यामुळे विद्यार्थिनींना प्रवासात अधिक सुरक्षितता मिळणार आहे. या सेवेमुळे पालक बिनघोर होणार, शिक्षणाला मिळणार प्रोत्साहन ही सेवा पालकांना शालेय प्रवासाबाबत शंका न ठेवता मुलींना शिक्षणात पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील मुलींचे बारावीपर्यंत शिक्षण अगदी सुरक्षितपणे पार पडणार आहे.
मानव विकास कार्यक्रमांतर्गत असलेल्या बसेसमध्ये महिला वाहक नियुक्त करण्यासंदर्भात महाव्यवस्थापकांचे कोणतेही पत्र आमच्यापर्यंत आलेले नाही. मला याबद्दल कल्पना नाही माहिती काढून सांगते. – तनुजा अहिरकर, विभाग नियंत्रक, भंडारा.
जिल्ह्यातील लेकींच्या शालेय प्रवासाला आता अधिक सुरक्षित आणि सुलभ स्वरूप मिळणार आहे, महिला वाहकांच्या नियुक्तीमुळे विद्यार्थिनींना एक सकारात्मक वातावरण उपलब्ध होणार आहे. ही योजना ग्रामीण भागातील शिक्षण वृद्धीला मदत करेल, अशी भूमिका आहे. मात्र भंडाऱ्याच्या विभाग नियंत्रक जर असे उत्तर देत असतील तर त्यांना पुन्हा पत्र देऊन आदेशाची अंमलबजावणी करण्यास सांगण्यात येईल. – श्रीकांत गभने, उपमहाव्यवस्थापक, परिवहन महामंडळ