गोंदिया: महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक व कृती समितीच्या नेतृत्वात अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी मानधनात वाढीसह पेन्शन लागू करण्याच्या मागणीसाठी सोमवारी  जिल्हा परिषदेवर मोर्चा काढून आंदोलनाला सुरुवात केली. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयासमोर आंदोलन करून शासनाचे लक्ष वेधले जात आहे. दरम्यान, मागण्या पूर्ण होतपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा या अंगणवाडी सेविका व मदतनिसांनी दिला असून जिल्ह्यातील सर्व १ हजार ८०० अंगणवाड्या बंद आहेत. त्यामुळे शासनाकडून यावर कोणता तोडगा काढला जातो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

 महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी युनियन आयटक व कृती समितीने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मागण्या ३ डिसेंबरपर्यंत पूर्ण न झाल्यास ४ डिसेंबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा दिला होता. मात्र, शासनाने यावर कुठलाही तोडगा न काढल्याने अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी सोमवारी जिल्हा परिषद कार्यालयावर मोर्चा काढत बेमुदत संपाला सुरुवात केली. जोपर्यंत अंगणवाडीसेविकांच्या मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत हा संप मागे घेणार नाही, अशी भूमिका घेतली. दरम्यान मंगळवारी दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरूच होते. यात अंगणवाडीसेविका, मदतनिस, मिनी अंगणवाडीसेविकांनी मंगळवारी गोंदियासह गोरेगाव, तिरोडा, आमगाव, सोलकसा, सडक अर्जुनी, अर्जुनी मोरगाव व देवरी या आठही तालुक्यातील महिला व बाल विकास विभाग कार्यालयापूढे आंदोलन केले. कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर अंगणवाडीसेविकांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला.

हेही वाचा >>>शेतकऱ्यांना दिलासा… पीक विमा खात्यात जमा होण्यास सुरुवात

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आजही भूमिका कायम

मोर्चात गोंदिया जिल्ह्यातील सर्व १ हजार ८००अंगणवाडी केंद्रातील तीन हजार अंगणवाडीसेविका, मदतनीस सहभागी झाल्याने जिल्ह्यातील सर्वच अंगणवाड्या बंद आहे. आजही हे आंदोलन कायम राहणार व आमच्या अंगणवाडीसेविका, मदतनीस भगिनी शासनाला जागे करण्याकरिता तीव्र निदर्शने करणार आहे.-हौसलाल रहांगडाले, प्रदेश उपाध्यक्ष, आयटक.