नागपूर : राज्य मंडळाच्या दहाव्या वर्गाच्या हिंदी लोकभारतीच्या पुस्तकातील संविधानाच्या प्रास्ताविकेत ‘धर्मनिरपेक्ष’ ऐवजी ‘पंथनिरपेक्ष’ तर ‘श्रद्धे’ ऐवजी ‘धर्म’ असे शब्द छापण्यात आले आहे. २६ नोव्हेंबर १९४९ या तारखेपुढे अनावश्यक (मीती मार्गशीर्ष शुक्ला सप्तमी, संवत दो हजार छह विक्रमी) असे लिहिले आहे. ‘स्वतः प्रत अर्पण’ ऐवजी ‘आत्मार्पित’ आहे. संविधानाच्या प्रास्ताविकेत दृष्ट हेतूनेच या चुका केल्याचा आरोप आता होत आहे.
भारतीय संविधानाची प्रास्ताविका ही संविधानाचा आत्मा मानली जाते. संविधानाचा उद्देश, तत्त्वज्ञान आणि मूलभूत मूल्ये प्रास्ताविका स्पष्ट करते. मात्र, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, पुणेद्वारा २०२३ ला पाचव्यांदा प्रकाशित करण्यात आलेल्या दहावीच्या हिंदी लोकभारती या पुस्तकातील भारतीय संविधानाच्या उद्देशिकेत अनेक चुका स्पष्ट दिसत आहेत.
अनेक शब्दांमध्ये चुका असल्याने त्या जाणीवपूर्वक करण्यात आल्याचा आक्षेप सामाजिक संघटनांकडून नोंदवला जात आहे. प्रास्ताविकेमध्ये धर्मनिरपेक्ष शब्द असताना त्याला पंथनिरपेक्ष असे करण्यात आले आहे. संविधानाच्या मूळ प्रास्ताविकेमध्ये केवळ २६ नोव्हेंबर १९४९ इतकेच छापले असताना त्यातही छेडछाड करण्यात आल्याचे दिसत आहे.
मूलभूत कर्तव्यात ‘समरसता’चा वापर
याच पाठ्यपुस्तकात पहिल्या पानावर भारतीय संविधानाच्या भाग चार ‘क’ मधील मूलभूत कर्तव्य छापण्यात आली आहेत. यातही अनेक चुका आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून अनेकदा वापरला जाणारा ‘समरसता’ हा शब्द ‘समता’ या शब्दाला पर्याय म्हणून वापरण्यात आला आहे.
भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेत चुका करणाऱ्या लेखक व प्रकाशन समितीवर कायदेशीर कारवाई करावी व त्या चुका विनाविलंब दुरुस्त करूनच पुस्तक विद्यार्थ्यांना वितरित करावे. – उत्तम शेवडे, प्रवक्ते, बसप.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
ही तक्रार मागील दोन ते तीन वर्षांपासून येत आहे. परंतु, यात काहीही तथ्य नाही. यासंदर्भात विभागाकडून अनेकदा स्पष्टीकरणही देण्यात आले आहे. भारतीय संविधानामधील मूळ प्रास्ताविकेत असलेले शब्दच येथे वापरण्यात आले आहेत. किंबहुना एनसीईआरटीच्या पुस्तकातही हेच शब्द आहेत. यात बालभारतीकडून कुठल्याही प्रकारचे बदल करण्यात आलेले नाहीत. – डॉ. अलका पोतदार, विशेषाधिकारी, हिंदी भाषा, पाठ्यपुस्तक मंडळ, पुणे.