नागपूर : मे महिन्यात सूर्य आग ओकायला लागतो, पण महाराष्ट्रात यावर्षी अवकाळी पावसाचा धुमाकूळ सुरू झाला आहे. हवामानात विचित्र पध्दतीने बदल होत असून एरवी होरपळणाऱ्या मे महिन्यात पाऊस अंगावर घ्यावा लागत आहे. राज्यात गेल्या आठवड्यापासून सातत्याने वादळी वारा आणि गारपीटीसह पावसाची हजेरी लागत आहे.

राज्यात उन्हाळ्याची सुरुवात नेहमीपेक्षा महिनाभर आधीच झाली. मार्च महिना संपण्याआधीच उष्णतेच्या लाटादेखील आल्या. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहोचला. त्यामुळे मी महिन्यात तो आणखी वाढणार अशी भिती असतानाच आता राज्यात पावसासाठी पूरक वातावरण निर्माण झाले आहे. येत्या २४ तासात विदर्भासह कोकण, मराठवाडा ते उत्तर महाराष्ट्र अशा सर्व भागात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

विदर्भातील काही शहरांमध्ये तापमान अजूनही ४० ते ४२ अंश सेल्सिअसदरम्यान असताना पाऊस मात्र हजेरी लावतच आहे. दरम्यान, हवामान खात्याने विदर्भातील अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, नागपूर, गोंदिया जिल्हांमध्ये पावसाचा “यलो अलर्ट” जारी केला आहे. सोबतच धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सातारा संभाजीनगर, जालना, बीड या जिल्ह्यातही पावसाचा “येलो अलर्ट” देण्यात आला आहे.

मुंबईत देखील आजपासून गुरुवारपर्यंत अवकाळी पावसाचा अंदाज देण्यात आला आहे. राजधानीतील बहुतांश भागांमध्ये दिवसा काहीसे ढगाळ वातावरण आणि सायंकाळंतर सोसाट्याचा वारा सुटून पावसाच्या तुरळक सरींची अपेक्षा वर्तवण्यात आली आहे. ठाणे आणि पालघरमध्येही वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भात सलग तीन दिवसांपासून वादळी वाऱ्यासह गारपीट होत आहे. उपराजधानीत सलग तिसऱ्या दिवशी गारपीट झाली.

तर बुलडाणा, अमरावती जिल्ह्यातही वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली. आठवडाभरपूर्वी याच नागपूरचे तापमान ४५ अंश सेल्सिअसवर जाऊन पोहचले होते. तर विदर्भातील जवळपास सर्वच शहरात तापमान ४४, ४५ अंश सेल्सिअस पर्यंत होते. दरम्यान, अवकाळी पावसामुळे आणि वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीमुळे मका, ज्वारी, बाजरी, तसेच शेतात काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आणि भीती सध्या व्यक्त केली जात आहे.