वर्धा : राज्याच्या मंत्रिमंडळाची नियमित आठवडी बैठक होत असते. त्यात होणारे निर्णय राज्यातील जनतेसाठी महत्वाचे असतात. प्रमुख्यने धोरनात्मक, मंजुरी देणारे, नवे प्रस्ताव व अन्य स्वरूपातील या निर्णयाची चांगलीच चर्चा घडते. आज मंत्रिमंडळ बैठकीत विविध निर्णय झाले. त्यातील एक निर्णय खास वर्धा शहरासाठी राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय व्हावा म्हणून वर्धेतील एका भागातील हजारो कुटुंब ५० वर्षापासून प्रतीक्षेत होती. आज अखेर दिलासा मिळाला आहे.

राज्य शासनाने आज जाहीर केले की वर्धा शहरातील रामनगर येथील भाडे पट्ट्याने दिलेल्या भूखंडधारकांना निवासी भूखंड कायमस्वरूपी मालकी हक्काने देण्यास मंजुरी देण्यात आली आहे. माझे घर आता माझ्या मालकीच्या भूखंडावर, असा हा आनंद राहणार.

हे प्रकरण अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. आमदार असतांना डॉ. पंकज राजेश भोयर यांना या परिसरातील नागरिकांनी अनेकवेळा निवेदन देत भूखंडाबाबत मार्ग काढण्याची विनंती केली होती. तेव्हा त्यांनी हा प्रश्न तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दारी मांडला. पुढे डॉ. भोयर हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाल्याने हा जोरात पूढे आला. तेव्हा जून महिन्यात डॉ. भोयर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटून ही बाब परत उपस्थित केली. माझ्या मतदारसंघातील हजारो कुटुंब शासनाकडून न्याय मिळण्याच्या प्रतीक्षेत असल्याची बाब त्यांनी मांडली. या भूखंडाच्या लिजचे नूतनिकरण २०५१ पर्यंत करण्यात आधीच त्यांनी निर्णय करवून घेतला होता. पण मालकीचे काय, असा तिढा होताच.

जुनच्या बैठकीत ही बाब मुख्यमंत्री यांच्याकडे मांडण्यात आल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले होते. मुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. श्रीकर परदेशी यांनी रामनगर लिज फ्री होल्ड करण्याबाबत महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांना निर्देश दिलेत. त्यानंतर वर्धा जिल्हाधिकाऱ्यांना या बाबत एक आठवड्यात प्रस्ताव सादर करण्याची सूचना केली. आता अखेर नगर विकास खात्याने मालकी देण्याचा निर्णय घेतला. त्यास मंत्री मंडळाने मंजुरी दिली.

या संदर्भात पालकमंत्री डॉ. भोयर म्हणतात की गत दहा वर्षांपासून रामनगर लिज धारकांचा प्रश्न मी लावून धरला होता. असंख्य नागरिक हे मालकीविना कसे पुढे राहणार ही चिंता होती. लिज वाढवून मिळाली पण मालकी देण्याचा प्रश्न होता. त्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. या वर्षी १३ me रोजी मुख्यमंत्री वर्ध्यात आले होते, तेव्हा पण ही बाब मी आवर्जून मांडली. तेव्हा मुख्यमंत्री महोदयांनी मालकी हक्क देण्याबाबत लवकरच निर्णय घेऊ, अशी हमी दिली होती. आज अखेर या नागरिकांच्या जीवनात पहाट उजाडली, याचा मला सर्वाधिक आनंद आहे. मी मुख्यमंत्र्यांचे खूप आभार मानतो.