चंद्रपूर : महायुती सरकारमधील एका मोठ्या मंत्र्यांच्या भावाच्या अतिहस्तक्षेपामुळे चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्राची वाटचाल परळीच्या दिशेने सुरू झाली आहे. येथील कुठलेही कंत्राट आपल्यालाच मिळावे, यासाठी दबंगशाहीचा वापर सुरू झाला असल्याने लहान-मोठे कंत्राटदार त्रस्त आहेत. छोट्या कंत्राटदारांना तर ‘बजेट’चे कारण देत मुख्य अभियंता कार्यालयात प्रवेश बंदी करण्यात आली आहे.
राज्यातील सर्वात मोठ्या २९२० मेगावॉट वीज निर्मितीची क्षमता असलेल्या चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्रात सध्या सावळागोंधळ सुरू आहे. हा गोंधळ केवळ कंत्राट मिळवण्यासाठी घातला जात आहे. राज्यात महायुतीचे सरकार सत्तेत येताच नागपूर ‘कुळातील’ एका बड्या मंत्र्यांच्या भावाचा चंद्रपूर वीज केंद्रातील हस्तक्षेप प्रचंड वाढला आहे. या वीज केंद्रातील प्रत्येक छोट्या व मोठ्या कामांमध्ये या मंत्र्याच्या बंधूचा हस्तक्षेप होत असल्याने वर्षानुवर्षे येथे काम करणारे मोठे कंत्राटदार चांगलेच त्रासले आहेत. आजवर कधीही या वीज केंद्रात दबंगशाहीचा प्रकार नव्हता. लहान-मोठे कंत्राटदार निविदा प्रक्रियेत सहभागी होऊन मिळेल ती कामे करायचे. मात्र, मागील काही महिन्यांपासून येथील चित्रच बदलले आहे.
‘बॉयलर क्लिनिंग’ असो किंवा इतर कुठलेही छोटे-मोठे काम, प्रत्येक काम मलाच हवे, असा हव्यास ठेवून मंत्र्यांच्या बंधूकडून येथे दबंगशाही सुरू आहे. यामुळे कंत्राटदारांना येथे काम करणे कठीण झाले आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास चंद्रपूर वीज केंद्र ‘परळी’ होण्यास वेळ लागणार नाही, अशी प्रतिक्रिया येथील कंत्राटदारांकडून व्यक्त होत आहे.
पूर्वी वीज केंद्रात काम करणे सोपे होते, प्रत्येक व्यक्तीला वीज केंद्रात, मुख्य अभियंता कार्यालयात प्रवेश मिळायचा. आता मात्र छोट्या कंत्राटदारांनी कार्यालयात येऊच नये, यासाठी ‘बजेट’ नाही असे गोंडस कारण देत लहान कंत्राटदारांना एकप्रकारे प्रवेश बंदीच करण्यात आली आहे. मंत्र्यांचे बंधू बहुतांश वेळा वीज केंद्रात येतात आणि हे काम याला द्या, ते काम त्याला द्या, असे निर्देश देतात. इतरांच्या नावावर सर्व कामे ते स्वत:च घेतात, अशी माहिती एका कंत्राटदाराने नाव न प्रकाशित करण्याच्या अटीवर दिली. वीज केंद्रातील अधिकारीदेखील मंत्र्यांच्या भावाच्या ‘हो’ ला ‘हो’ देतात, असेही कंत्राटदारांचे म्हणणे आहे. वीज केंद्रात कंत्राटदारी करणे आता कठीण झाले आहे, असे मोठ्या कंत्राटदारांचे म्हणणे आहे.
कंत्राटदारांना मुख्य अभियंता कार्यालयात प्रवेशबंदी!
एका कंत्राटदाराने दिलेल्या माहितीनुसार, पूर्वी निविदा प्रक्रियेसाठी, ‘ऑर्डर’ची प्रत घेण्यासाठी मुख्य अभियंता कार्यालयात जावे लागायचे. आता मात्र थेट टपालद्वारे किंवा ‘इ-मेल’ करून ‘ऑर्डर’ दिली जाते. तुम्ही कार्यालयात यायचेच नाही, एकप्रकारे प्रवेश बंदी, अशा प्रकारचे आदेशच दिले गेले असल्याने कंत्राटदारांमध्ये चीड व्यक्त होत आहे. एकीकडे मंत्र्याच्या भावाचा हस्तक्षेप, त्याला केव्हाही प्रवेश आणि इतर कंत्राटदारांना प्रवेश बंदी, हा प्रकार योग्य नाही, अशी प्रतिक्रिया येथे व्यक्त होत आहे.
…तरीही कारवाई नाही
ही बाब काही कंत्राटदारांनी मुख्यमंत्र्यांच्याही निदर्शनास आणून दिली. मात्र तरीही काहीही कारवाई होत नसल्याचे सांगण्यात आले. हा सर्व प्रकार वीज केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड मुकाट्याने बघत आहेत. या बड्या मंत्र्यांच्या अशाच कारभारामुळे २०१९ मध्ये पक्षाने त्यांना विधानसभेची उमेदवारी नाकारली होती, हे येथे उल्लेखनीय. नागपुरातील या बड्या मंत्र्यांच्या एका नातेवाईकाची ‘ट्रान्समिशन’ (पारेषण)मध्ये ‘एचआर’ विभागात मोठ्या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. तेथूनच सर्व कारभार सुरू असल्याचे सांगण्यात सांगितले जाते.