अकोला: पशुसंवर्धन विभागामार्फत ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांसाठी “राष्ट्रीय गोकुळ मिशन” अंतर्गत मैत्री पशुपालक मदतनीस म्हणून प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासाठी अर्ज मागवण्यात आले आहेत. या माध्यमातून प्रशिक्षित तरुणांना गायी-म्हशींमध्ये कृत्रिम बीज रोपण (कृत्रिम रेतन) व संबंधित सेवा देण्याची संधी मिळून रोजगार उपलब्ध होणार आहे.

स्थानिक गोवंशीय जातींच्या विकास आणि संवर्धनासाठी राष्ट्रीय गोकुळ अभियान राबविण्यात येत आहे. दुधाची वाढती मागणी पूर्ण करण्यासाठी आणि देशातील ग्रामीण शेतकऱ्यांसाठी दुग्धव्यवसाय अधिक फायदेशीर बनवण्यासाठी ही योजना गायींचे दूध उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी महत्त्वाची आहे. ही योजना २०२१ ते २०२६ पर्यंत राष्ट्रीय पशुधन विकास योजनेअंतर्गत सुरू ठेवण्यात आली आहे. या योजनेमुळे उत्पादकता वाढेल आणि या कार्यक्रमाचा फायदा भारतातील सर्व गायी आणि म्हशींना होईल. विशेषतः लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना या कार्यक्रमाचा लाभ होईल. राष्ट्रीय गोकुळ मिशन अंतर्गत मैत्री पशुपालक मदतनीस प्रशिक्षित केले जाणार आहेत.

दरम्यान, अकोला जिल्ह्यासाठी एकूण ६० उमेदवारांची निवड केली जाणार असून त्यामध्ये सर्वसाधारण प्रवर्गातून ४९, अनुसूचित जाती प्रवर्गातून सात व अनुसूचित जमाती प्रवर्गातून चार उमेदवारांचा समावेश आहे. या प्रशिक्षणाच्या माध्यमातून प्रशिक्षित तरुणांना गायी-म्हशींमध्ये कृत्रिम बीज रोपण (कृत्रिम रेतन) व संबंधित सेवा देण्यासाठी संधी मिळणार आहे. यामुळे दुग्ध उत्पादन वाढून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट होण्यास मदत होईल तसेच बेरोजगार तरुणांना रोजगाराच्या संधीही उपलब्ध होतील.

प्रशिक्षणाचा कालावधी तीन महिने आहे. त्यामध्ये पहिला महिना वर्ग शिक्षण म्हणून पशुवैद्यकीय महाविद्यालयात घेतला जाईल आणि पुढील दोन महिने प्रत्यक्ष कामावर आधारित प्रशिक्षण जिल्ह्यातील पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये दिले जाईल. अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी किमान १२ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे व वय १८ ते ३५ वर्षांच्या दरम्यान असावे.

अर्जाचा नमुना पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) कार्यालयात कार्यालयीन वेळेत उपलब्ध आहे. इच्छुक उमेदवारांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत आपले अर्ज लवकरात लवकर पंचायत समितीच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपआयुक्त पशुसंवर्धन डॉ. जगदीश बुकतरे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नरेंद्र अरबट यांनी केले आहे.