यवतमाळ : मंगळवारी, २३ सप्टेंबर रोजी अवकाशात मोठी खगोलीय घटना घडणार असून, नेपच्यून ग्रह व सूर्य आमने-सामने येणार आहेत. हे दोन ग्रह पृथ्वीच्या दृष्टीने समोरासमोर राहणार आहे.

नेपच्यून हा आपल्या सूर्यमालेत आठवा व शेवटचा ग्रह असून सूर्यापासून त्याचे सरासरी अंतर चार अब्ज ४९ कोटी ८२ लक्ष ५२ हजार ९०० किलोमीटर आहे. ग्रहांच्या कक्षा लंब वर्तुळाकार असल्याने ही अंतरे कधीच सारखी राहत नाही. सूर्य ते पृथ्वी या अंतराच्या ३० पटीने नेपच्यून ग्रह सूर्यापासून दूर आहे. या वर्षी मंगळवारी होणाऱ्या या खगोलीय घटनेत नेपच्यूनचे पृथ्वीपासूनचे कमीत कमी अंतर चार अब्ज ३२ कोटी किलोमीटर राहील. हा ग्रह २३ सप्टेंबर १८४६ रोजी शोधला गेला.

नेपच्यूनच्या शोधाची कथा अतिशय रंजक आहे. युरेनसच्या कक्षेचे गणित जेव्हा शास्त्रज्ञांनी मांडले, तेव्हा युरेनस त्याची कक्षा सांभाळीत नाही, असे लक्षात आले. १८२२ साली युरेनस त्याच्या कक्षेत अतिशय वेगाने पुढे जात होता. परंतु त्यानंतर त्याची गती मंदावली. त्यामुळे युरेनसच्या गतीवर परिणाम करणारा एखादा ग्रह असावा असा तर्क १८४३ साली इंग्रज शास्त्रज्ञ ‘ली- व्हेरिअर’ यांनी व्यक्त केला. युरेनसच्या पुढे आणखी एखादा ग्रह असेल तर तो केवढा व नेमका कुठे असेल, याचे गणित मांडण्यात आले. नंतर २३ सप्टेंबर १८४६ रोजी जर्मन शास्त्रज्ञ ‘जोहान गँले’ यांनी गणिताने ठरविलेल्या ठिकाणी, म्हणजे मकर राशीत दुर्बीण लावली, तेव्हा तो बरोबर तेथे सापडला. मात्र याच्या शोधाबाबत गणित मांडणारे जॉन काऊच ॲडम्स, ली व्हेरिअर व जोहन गँले यांच्यात वाद झाल्याने, नेपच्यून ग्रहाच्या शोधाचे श्रेय या तिघांनाही देण्यात आले.

‘नेपच्यून’ हे रोमनांच्या समुद्री देवतेचे नाव आहे. भारतात याला ‘वरूण’ देवतेच्या नावाने संबोधले जाते. नेपच्यून हा पूर्णतः वायूचा बनलेला असून त्याला विरळ असे एक वलय आहे. तसेच त्याला एकूण १३ उपग्रह आहेत. या ग्रहाला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करण्यासाठी पृथ्वीचे १६५ वर्षे लागतात.

मंगळवार, २३ सप्टेंबरला नेपच्यून ग्रहाची प्रतीयुती असल्याने, पृथ्वीच्या दृष्टीने तो व सूर्य समोरासमोर येतील. म्हणूनच नेपच्यून ग्रह पूर्ण प्रकाशित राहील. त्यामुळे या ग्रहाचे अवलोकन करण्यासाठी खगोल अभ्यासकांना सुवर्णसंधी आहे. मात्र त्यासाठी अत्यंत प्रभावी दुर्बिणीची आवश्यकता भासते. सध्या तो ‘मीन’ राशीत असून त्याची तेजस्विता ७.७ असल्याने मोठ्या दुर्बिणीनेसुद्धा एका फिकट निळ्या रंगाच्या बिंदूच्या स्वरूपात दिसतो. मीन रास ही सध्या सूर्यास्त झाल्याबरोबरच पूर्वेला उगवते. त्यामुळे हा ग्रह रात्रभर आकाशात राहील. हा ग्रह यापूर्वी २० सप्टेंबर २०२४ रोजी सूर्यासमोर आला होता, तर यानंतर तो २५ सप्टेंबर २०२६ रोजी पुन्हा सूर्यासमोर येईल. दर ३६७ दिवसांनी नेपच्यून हा ग्रह पृथ्वीच्या दृष्टीने सूर्यासमोर येतो.

मानवी जीवनावर परिणाम नाही

कोणताही ग्रह किमान अंतरावर आल्याने किंवा सूर्यासमोर आल्याने कोणावरही राशीपरत्वे शुभाशुभ परिणाम होत नाही. त्यामुळे आकाश निरभ्र असल्यास ज्यांच्याकडे प्रभावी दुर्बीण आहे, अशांनी या ग्रहाचे अवलोकन करावे, असे आवाहन स्काय वॉच ग्रुप यवतमाळचे अध्यक्ष रविंद्र खराबे, प्रमोद जिरापुरे, उमेश शेंबाडे, भूषण ब्राह्मणे, जयंत कर्णिक, पुजा रेकलवार, मानसी फेंडर व शुभांगी झिलपे यांनी केले आहे.