नागपूर : जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील येनवेरा गावातील एसबीएल एनर्जी नावाच्या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला मोठी आग लागली. या आगीत दोन मशीन जळून राख झाल्याची माहिती आहे. ही घटना सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली असून या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अचानक लागलेल्या आगीमुळे एकच खळबळ उडाली.

ही आग ‘शॉर्ट सर्किट’मुळे लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. स्फोटके बनविणाऱ्या कंपनीला लाग लागल्याची माहिती मिळताच काटोलचे सहायक पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्यासह अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाले. दोन तासांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. गेल्या फेब्रुवारी महिन्यात काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एसबीएल बारूद कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना ताजीच असताना दुसरी घटना घडल्यामुळे व्यवस्थापनाच्या कार्यप्रणालीवर संशय निर्माण झाला आहे.

काटोल तालुक्यातील येनवेरा गावात एसबीएल एनर्जी प्लांट असून या प्रकल्पाला पेट्रोलियम आणि स्फोटक सुरक्षा संघटनेने व्यावसायिक स्फोटके तयार करण्याचा परवाना दिला आहे. सोमवारी पहाटे पाच वाजताच्या सुमारास कंपनी बंद असताना अचानक इमारत क्रमांक पाचमध्ये शॉर्ट सर्किट झाल्याचा आवाज काही सुरक्षारक्षकांना आला. त्यांनी लगेच इमारतीकडे धाव घेतली असता तेथे आग लागल्याचे दिसून आले.

इमारतीच्या गोदामात सुमारे एक ते दीड हजार मेट्रिक टन अमोनियम नायट्रेटच्या पिशव्या ठेवलेल्या होत्या. शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत अमोनियम नायट्रेटच्या साठ्याला आग लागल्याचे बोलले जाते. काही मिनिटातच आगीने रौद्र रुप धारण केले. त्यामुळे इमारतीमध्ये असलेल्या मशिनलाही आग लागली. माहिती मिळताच अग्निशमन दलाची वाहने एसबीएल कंपनीत पोहचल्या. काटोल पोलीसही तेथे पोहचले. अग्निशमन दलाने तीन तासांपर्यंत पाण्याचा मारा करीत आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला.

घटनेला जबाबदार कोण?

अमोनियम नायट्रेट हा पदार्थ ज्वलनशील असूनही जवळपास हजारांवर पिशव्या गोदामाच्या बाहेर ठेवल्या होत्या. हा प्रकार नियमबाह्य आहे. त्यामुळे कंपनीच्या निष्काळजीपणा या घटनेला जबाबदार असल्याची चर्चा आहे. पहाटेच्या सुमारास कंपनीत कामगार नव्हते. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली, असे बोलले जाते.

एसबीएल कंपनीत पहाटेच्या सुमारास खरड्यांच्या ढीगाला आग लागली होती. त्यामुळे आगीत कंपनीतील एक मशिनचे बरेच नुकसान झाले. आगीवर दोन तासांत नियंत्रण मिळविण्यात आले. या प्रकरणी अद्याप कंपनीकडून तक्रार आली नसून उद्या तक्रार आल्यानंतर झालेल्या नुकसानाचा आकडा कळेल. सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे.अनिल म्हस्के (सहायक पोलीस अधीक्षक, नागपूर ग्रामीण)

आग किरकोळ स्वरुपाची – कंपनीचे प्रसिद्धी पत्रक

दरम्यान एसबीएल एनर्जी या कंपनीला लागलेली आग किरकोळ स्वरुपाची होती. त्यावर त्वरित नियंत्रण मिळवण्यात आले होते, असा दावा एसबीएल एनर्जी या कंपनीकडून करण्यात आला. जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील येनवेरा गावातील एसबीएल एनर्जी नावाच्या स्फोटके बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला सोमवारी आग लागली होती. याबाबत मंगळवारी कंपनीने माध्यमांसाठी एक निवेदन प्रसिद्धीला दिले आहे.

त्यानुसार कंपनीमध्ये मोठी दुर्घटना झाली नाही . ती खूप छोटी घटना आहे. यामध्ये फक्त स्पार्क होऊन बाजूच्या वस्तूंना आग लागली. ती त्वरित विझवण्यात आली. यामध्ये कोणतीही यंत्र सामुग्री जळालेली नाही. दोन मशीन जळाल्याचा बातमीतील उल्लेख चुकीचा आहे., असा दावा कंपनीने केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान कंपनीला लाग लागल्याची माहिती मिळताच काटोलचे सहायक पोलीस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्यासह अग्निशमन दलाची वाहने तातडीने घटनास्थळी रवाना झाले होते. फेब्रुवारी महिन्यात काटोल तालुक्यातील कोतवालबड्डी येथील एका कंपनीमध्ये स्फोट झाल्याची घटना घडली होती. त्यानंतर दुसरी घटना आहे.