नागपूर : रक्तचाचणी ही आरोग्य तपासणीतील एक मूलभूत आणि अत्यावश्यक प्रक्रिया आहे. यामुळे शरीरातील अनेक आजारांची लवकर ओळख पटते आणि योग्य उपचार शक्य होतात. रक्तचाचणीमुळे आजारांचे लवकर निदान होण्यास मदत होते, शरीरातील पोषण स्थिती समजते, औषधांचा परिणाम तपासता येतो. थोडक्यात, रक्तचाचणी ही आरोग्याच्या आरशासारखे काम करते. शरीरात काही बिघाड सुरू होत असेल, तर तो वेळीच दाखवते आणि जीव वाचवण्यास मदत करते. मात्र रक्तचाचणी खूप महागडी असल्याने त्याचे गंभीर परिणाम ग्रामीण व आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांवर होतात. महागडी चाचणी परवडत नसल्यामुळे अनेक रुग्ण तपासणी टाळतात.
त्यामुळे आजार लवकर ओळखला जात नाही आणि तो गंभीर होतो. महागड्या चाचण्या परवडत नसल्यामुळे अनेक वेळा ग्रामीण रुग्ण वैद्यकीय सल्ला घेणे टाळतात. या सर्व बाबींचा विचार करून नागपूरच्या संशोधकांनी रक्तचाचणी क्षेत्रात महत्वपूर्ण संशोधन केले आहे. त्यांच्या संशोधनामुळे तब्बल ६० ते ७० प्रकारच्या रक्त तपासण्या केवळ एका मशीनमधून आणि तेही अत्यंत कमी खर्चात करता येणार आहेत.
स्वदेशी पोर्टेबल मशीन
नागपूरच्या दोन महिला संशोधकांनी ग्रामीण भागातील आरोग्यसेवेतील मोठी क्रांती घडवणारी एक अत्यंत उपयुक्त यंत्रणा विकसित केली आहे. डॉ. संगीता समनवार यांनी डॉ.जयू कलंबे यांच्या मार्गदर्शनात ‘स्वदेशी ब्लड सेंसिंग मशीन’ तयार केली आहे. बायो स्पेक्ट्रानिक्स नावाच्या या स्वदेशी आणि पोर्टेबल मशीनच्या माध्यमातून तब्बल ६० ते ७० प्रकारच्या रक्त तपासण्या एका मशीनमधून शक्य होणार आहेत. डॉ. संगीता समनवार यांच्या मते, “ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी कमी आहेत. रक्त तपासणीसाठी रुग्णांना शहरात जावे लागतं आणि त्यावर खूप खर्च होतो. त्यामुळे एक अशी मशीन हवी होती जी तिथल्याच केंद्रांवर सहज वापरता येईल आणि कमी खर्चात अधिक तपासण्या करता येतील. या स्वदेशी यंत्रणेवर काम २०२१ मध्ये सुरू झालं. २०२३ मध्ये त्याची यशस्वी चाचणी झाली असून सध्या त्याच्या पेटंटसाठी प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. एकदा पेटंट मिळाल्यानंतर ही यंत्रणा देशभरात वापरण्यासाठी खुले होईल.
मशीनचे खास वैशिष्ट्य?
– सॉफ्टवेअरवर आधारित: ही मशीन पूर्णपणे सॉफ्टवेअर बेस्ड असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून रक्त तपासण्या सोप्या आणि किफायतशीर पद्धतीने करते.
– अत्यल्प रक्तात तपासणी शक्य: पारंपरिक पद्धतीपेक्षा यामध्ये खूपच कमी रक्त नमुना लागतो.
– बहुउद्देशीय उपयोग: यामधून ग्लुकोज, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन, इलेक्ट्रोलाइट्स यांसारख्या अनेक महत्वाच्या तपासण्या करता येतात.
– ग्रामीण आरोग्य केंद्रांसाठी वरदान: महागडी उपकरणं आणि शहरी सुविधा नसलेल्या आरोग्य केंद्रांमध्ये ही मशीन अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.