लोकसत्ता टीम
बुलढाणा : अनेक वर्षापासून मातंग समाजाचे लोक लग्नात डफडे वाजविण्याचे काम करतात. मात्र, आता नविन पीढीला हे काम अमान्य आहे. एका व्यक्तीला लग्नात डफडे वाजवायचे नाही, असे सांगून चौघांनी बेदम मारहाण केली. यात डफडे वाजवणारी व्यक्ती गंभीर जखमी झाली असून धाड येथे उपचार करण्यात येत आहे.
बुलडाणा तालुक्यातील सोयगाव येथे रविवारी (२० एप्रिल) रात्री ११ वाजताच्या सुमारास हा खळबळजनक घटनाक्रम घडला आहे. या प्रकरणी धाड पोलीस ठाण्यात चौघाविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात धाड पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी कौतीक साहेबराव महाले (४२, रा. सोयगाव, ता. जि. बुलढाणा) यांना तु लग्नामध्ये डफडे का वाजवितो? अशी विचारणा करुन चौघांनी हटकले. तसेच लग्नामध्ये डफडे वाजवाचे नाही, असा दमही चौघा आरोपींनी दिला. एवढ्यावरच न थांबता त्यांनी संगनमत करुन लोखंडी रॉड तसेच लाथा बुक्यांनी त्याला जीवानिशी ठार मारण्याच्या उद्देशाने मारहाण केली.
या प्रकरणी फिर्यादी कौतीक महाले यांच्या तक्रारीवरुन आरोपी अमोल गुलाबराव महाले (३५) अनिल गुलाबराव महाले (२६), अंकुश राजाराम निकाळजे (४०), आणि सोनु रमेश निकाळजे (२०)सर्व राहणार सोयगाव, ता. जि. बुलडाणा यांच्या विरुद्ध धाड पोलीस ठाण्यात विविध कलमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या घटनेचा पुढील तपास धाड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर केंद्रे करीत आहे. या घटनेमुळे सोयगावसह बुलढाणा तालुका व जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून उलटसुलट चर्चाना पेव फुटले आहे. तसेच समाज बांधवातून विविध प्रतिक्रिया उमटत आहे.