लोकसत्ता टीम

नागपूर : तरुणीच्या प्रेमात वेडा झालेल्या तरुणाने तिचे प्रेम मिळविण्यासाठी तोतया सैन्य अधिकारी बनला. तिला ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये भेटायला गेला. मात्र, तेथे एका वरिष्ठ अधिकाऱ्याला डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केल्यामुळे तो चौकशीच्या जाळ्यात अडकला. त्याला वाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. परंतु, त्या युवकाच्या कृतीमुळे ऑर्डनन्स फॅक्टरी परीसरातील सुरक्षा यंत्रणा पुरती हादरली होती. अभिजीत अनिल चौधरी (रा. प्लॉट क्रमांक १६, कटरा लेआउट, हिंगणा) असे तोयया ब्रिगेडियरचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार १३ फेब्रुवारीला ३२ वर्षीय आरोपी अभिजीत चौधरी हा भारतीय लष्करातील ब्रिगेडियरची वर्दी घालून गेट क्रमांक २ येथे एका तरुणीसोबत बोलत होता. तरुणीच्या तो प्रेमात पडलेला दिसत होता. तिला प्रेमाची मागणी घालत होता. दरम्यान एका वरिष्ठ अधिकाऱ्यांचे त्याच्याकडे लक्ष गेल़े. यावेळी आरोपी अभिजितने त्यांना पाहताच डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ केला. ब्रिगेडियर दर्जाचा अधिकारी तरुणीसोबत इथे काय करतोय आणि त्या अधिकाऱ्याने डाव्या हाताने ‘सॅल्यूट’ मारल्याने अधिकाऱ्यांना संशय आला. त्यांनी लगेच त्याला जवळ बोलावले आणि काही प्रश्न केले. यावेळी तो उत्तरे देऊ शकला नाही.

आणखी वाचा-नागपूर : शिष्यवृत्तीचे १९ हजारांवर अर्ज महाविद्यालयांकडे प्रलंबित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत त्यांनी लगेच वाडी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी चौकशी केली असता त्याच्याकडे वेगवेगळे ओळखपत्र आढळले. केवळ प्रेयसीला ‘ईम्प्रेस’ करण्यासाठी सैन्य अधिकाऱ्याची वर्दी घातल्याची कबुली त्या तरुणाने दिला. संरक्षण विभागाच्या प्रतिबंधीत क्षेत्रात गैरकायदेशीररित्या प्रवेश घेतल्याप्रकरणी वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीस अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्यास दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास ठाणेदार राजेश तटकरे पुढील तपास करीत आहेत.