अकोला : मूर्तिजापूर येथील एका २९ वर्षीय तरुणीची ‘मॅट्रिमोनी साईट’वरून जालना येथील शासकीय कंत्रादाराशी ओळख झाली. दोन महिन्यातील संवादातून ओळखी वाढत गेली. लग्नाचे आमिष दिल्याने तरुणी त्याच्या घरी गेली. त्यावेळी तरुणाने शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मात्र, नंतर नोकरी नसल्याचे कारण सांगून लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे मोठा धक्का बसलेल्या मूर्तिजापूर येथील तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणात जालना येथील आरोपी स्वप्नील विश्वनाथ भिसे (शासकीय कंत्राटदार, रा. घर नं. २९, योगेशनगर, अंबड रोड) याच्याविरोधात अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मूर्तिजापूर शहर ठाण्यांतर्गत २९ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. पीडित मुलीने एका लग्न जुळवणाऱ्या वेबसाइटवर वर्षभरापूर्वी नोंदणी केली होती. जुलै २०२४ मध्ये स्वप्नील भिसे याच्याशी वेबसाईटच्या माध्यमातून ओळख झाली.
पुढे समाज माध्यमांवर त्यांचा संवाद वाढला. दरम्यान, आरोपीने दोन महिन्यात लग्न करण्याचे आश्वासन दिले. २४ एप्रिल रोजी स्वप्नीलने संपर्क साधून जालना येथे घरी कोणी नसल्याचे सांगून २८ एप्रिल रोजी तरुणीला बोलावले. सायंकाळी बसस्थानकावरून स्वप्नील तरुणीला दुचाकीवरून घरी घेऊन गेला. घरीच त्याने रात्री तरुणीवर अत्याचार केला. त्यानंतर मात्र काही दिवसांनी स्वप्नीलने नोकरी नसल्याचे कारण देत लग्नास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे तरुणीला मोठा धक्का बसला.
घडलेला सर्व प्रकार तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितला. या प्रकरणी तरुणीने मूर्तिजापूर शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन लेखी तक्रार दाखल केली. या प्रकरणात मूर्तिजापूर पोलिसांनी आरोपी स्वप्नील भिसेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ अल्पवयीन मुली, तरुणी व महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. बार्शीटाकळी पोलीस ठाण्यांतर्गत २२ वर्षीय विवाहित महिलेची समाज माध्यमातून बुलढाणा जिल्ह्यातील एक तरुण व दाम्पत्यासोबत ओळख झाली. त्या ओळखीतून पुणे जिल्ह्यातील आळंदी येथील एका लॉजवर विवाहित महिलेला ते घेऊन गेले. त्या ठिकाणी गुंगीचे औषध देऊन विवाहित महिलेवर बलात्कार करण्यात आला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून बार्शीटाकळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिन्ही आरोपींना अटक केली आहे. त्यानंतर आता मूर्तिजापूर येथील तरुणीवर जालना येथे अत्याचार करण्यात आला आहे.