लोकसत्ता टीम

नागपूर : शहरातून आठवडी बाजार किंवा पार्कींगमधून दुचाकी चोरी जाण्याचे प्रमाण अचानक वाढले होते. त्यामुळे गुन्हे शाखेच्या पथकाने ‘हॉटस्पॉट’शोधून पाळत ठेवली. पोलिसांनी एका चोरट्याला दुचाकी चोरताना अटक केली आणि त्याच्याकडू एक-दोन नव्हे तर तब्बल १११ चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या.

नागपूरच्या इतिहासातील सर्वात मोठी कारवाई पोलिसांनी केल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. रविंद्रकुमार सिंगल यांनी पत्रपरिषदेत दिली. ललित गजेंद्र भोगे (२४, विकासनगर, कोंढाळी) असे आरोपीचे नाव आहे. २१ डिसेंबर रोजी अनिल पखाले (वाडी) यांची दुचाकी चोरीला गेली होती. या गुन्ह्याच्या तपासात त्या परिसरातून अनेक दुचाकी चोरीला गेल्याचे समोर आले. शहरात वाहनचोरीचे प्रमाण वाढल्याने अधिकाऱ्यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेच्या वाहनचोरी विरोधी पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले यांनी तपास सुरू केला.

आणखी वाचा-उद्योग, आरोग्यसेवेत सुधारणा, कृषी क्षेत्राकडे लक्ष देण्याची गरज; गोंदियामध्ये विमानसेवेमुळे गुंतवणूक वाढीची शक्यता

चोरीच्या घटना घडलेल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात आले. पोलिसांनी चोरीचे ‘हॉटस्पॉट’ शोधले आणि २५० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधून शेकडो तासांचे फुटेज तपासले. आरोपी ललित भोगे हा काही ठिकाणी सापडला. शहरातून तो दुचाकी बाहेर घेऊन जाताना दिसत होता. मात्र, वाडीनंतर आरोपी कुठे गेला हे कळू शकत नव्हते. पोलिसांनी सायबर सेलच्या मदतीने ई-सर्व्हेलन्सद्वारे तपास केला असता कोंढाळी शहराचे नाव समोर आले. तेथे तपासादरम्यान ललीत भोगे आढळून आला. त्याच्याकडे संशयित वाहनही होते. त्यांनी सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र नंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्या घरातून २० चोरीची वाहने जप्त केली आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त डॉ. रविंद्र सिंगल गुन्हे शाखेचे उपायुक्त निमित गोयल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिल इंगोले, दिपक रिठे, अजय शुक्ला, पंकज हेडाऊ, राहुल कुसरामे आणि सायबरचे बलराम झाडोकार यांनी केली.

विदर्भातील ९ जिल्हे केले लक्ष्य

आरोपी ललीत भोगे याने विदर्भातील नऊ जिल्हे दुचाकी चोरीसाठी लक्ष्य केले. त्यात अकोला, अमरावती, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ आणि भंडारा जिल्ह्यातून त्याने दुचाकी चोरल्या. तसेच वाडी (११), धंतोली (८), सीताबर्डी (३), नंदनवन, एमआयडीसी, कोराडी आणि इमामवाड्यातून २८ दुचाकी चोरी केल्या. दुचाकी चोरल्यानंतर खेड्यात जाऊन अगदी १० ते १५ हजार रुपयांमध्ये विक्री करीत होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रेमविवाह केल्यानंतर निवडला मार्ग

ललित भोगे याने कुटुंबियांच्या विरुद्ध जाऊन एका तरुणीशी प्रेमविवाह केला. तो कोंढाळीला राहायला लागला. संसार सुरु झाल्यानंतर घरात आर्थिक अडचणी येऊ लागल्या. पत्नीसुद्धा त्याला पैसे आणण्यासाठी तगादा लावू लागली. त्यामुळे ललितने चक्क दुचाकी चोरीचा धंदा सुरु केला. सुरुवातीला त्याला यश आल्यानंतर त्याने जवळपास ३ हजारां पेक्षा जास्त दुचाकी चोरल्याचा संशय आहे.