चंद्रपूर: शहरात पाच ठिकाणी ५ फाउंटेन उभारण्यासाठी सव्वा दोन कोटीची निविदा मर्जीतील कंत्राटदाराला देण्यासाठी अनेक नियम पायदळी तुडवले. अंदाजपत्रकात अनेक पटीने दरवाढ केली. या निविदा प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा आरोप जनविकास सेनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी नगरसेवक पप्पू देशमुख यांनी पत्रपरिषदेत केला. दरम्यान या प्रकरणी प्रशासक तथा आयुक्त विपिन पालिवाल यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशीही मागणी केली आहे.
जटपूरा प्रभागातील प्रियदर्शनी चौक, हिंदुस्तान लालपेट प्रभागातील कामगार चौक, तुकुम प्रभागातील स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, शास्त्रीनगर प्रभागातील एसटी वर्कशॉप जवळील शहीद भगतसिंग चौक, भानापेठ प्रभागातील रामाळा तलाव या ठिकाणी फाउंटेन उभारणी व बांधकामाच्या कामा करिता १७ फेब्रुवारी २०२३ रोजी महापालिकेतर्फे एक निविदा प्रसिद्ध करण्यात आली. मर्जीतल्या कंत्राटदाराला काम देण्यासाठी आयुक्त विपिन पालीवाल यांनी या निविदा प्रक्रियेत अनेक नियम पायदळी तुडवले, अंदाजपत्रकामध्ये चार-चार पटीने कामाची किंमत वाढवून अवास्तव दर टाकले तसेच अपात्र ठरणाऱ्या मर्जीतील कंत्राटदाराला पात्र केले.
हेही वाचा… चंद्रपूर जिल्ह्यातील पाचही प्रमुख नद्या दहा वर्षांपासून प्रदूषित; कृती आराखडा केवळ कागदावरच
इतर कंत्राटदारांना हेतू पुरस्कार अपात्र ठरविल्याचा आरोप देशमुख यांनी केला. या संपूर्ण घोटाळ्याची उच्चस्तरीय चौकशी करून आयुक्त पालीवाल यांचे विरुद्ध फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे अशी मागणी त्यांनी यावेळी केली. याबाबत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. दरम्यान आयुक्त विपीन पालीवाल यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाची चौकशी केली जाईल. त्यात दोष आढळून आल्यास कारवाई केली जाईल असे सांगितले.
असा झाला घोटाळा…
नागपुरातील प्रशांत मद्दीवार एजन्सीला काम देण्यासाठी नियमांना बगल देण्यात आली. पुरेसा अनुभव नसतांना निविदा प्रक्रियेत जाणीवपूर्वक ‘जॉईंट व्हेंचर’ ची तरतूद केली. या एजन्सीने दिल्ली येथील ‘एक्वारियस टेक्नॉलॉजी’ या एजन्सीचे जॉईन वेंचरचे पत्र दिले. मात्र याच निविदा प्रक्रियेत ‘एक्वारस टेक्नॉलॉजी’ या एजन्सीने एम. एस. भांडारकर व अंकुश गोडबोले यांच्या एजन्सी सोबत सुद्धा जॉईन्ट वेंचरचे पत्र दिले. एका निविदा प्रक्रियेमध्ये एखाद्या एजन्सीला एकाच कंत्राटदारासोबत जॉईंट वेंचर करता येते. त्यामुळे एक्वारस टेक्नॉलॉजी सोबत जॉईन वेंचर करणाऱ्या तीनही एजन्सीला अपात्र ठरविणे गरजेचे होते. परंतु तसे केले नाही.मद्दीवार या एजन्सीने केवळ चार लक्ष रुपयांचे कार्यादेश जोडले. निविदा प्रक्रियेत कार्यादेश ग्राह्य धरण्यात येत नाही. पुरेशा किमतीचे काम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र नसतानाही या एजन्सीला पात्र ठरवून प्रमाणपत्र उपलब्ध करून देण्यासाठी वेळ देण्यात आला. अंदाजपत्रकीय किमतीपेक्षा केवळ ०.९१ टक्के कमी दराने मंजूर करून देयके सुद्धा अदा केली.
पात्र कंपन्या अपात्र
अहमदाबाद येथील क्लासिक फाऊंटेन व लखनऊ येथील त्रिवी फाउंटेन या एमएसएमई या वर्गात मोडणाऱ्या कंपन्यांना अपात्र केले. या दोन्ही एजन्सी स्वतः फाउंटेन तयार करणाऱ्या कंपन्या आहेत. मात्र या दोन्ही एजन्सीला निविदा प्रक्रियेत अपात्र ठरविण्यात आले. शरद काळे या नागपूरच्या एजन्सीला सुद्धा अशाच प्रकारे अपात्र केले. अपात्र ठरवताना कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार या एजन्सीज सोबत केला नाही. एकतर्फी कारवाई करण्यात आली.