नागपूर : महात्मा गांधी यांची हत्या झाली तो दिवस ३० जानेवारी १९४८. तेंव्हापासून आजपर्यंत एक प्रश्न सतत चर्चेत येतो तो म्हणजे महात्मा गांधी यांची हत्या झाली त्या दिवशी नथुराम गोडसे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा सदस्य होता का?या अनुषंगाने वेळोवेळी आरोपप्रत्यारोप झाले आहेत आणि हा वाद कोर्टातही पोहोचला. याशिवाय गांधी हत्या नाही तर वध होता असाही दावा उजव्या विचारणीच्या लोकांकडून करण्यात आला आहे. मराठी विश्वकोशामध्येही आजपर्यंत तसाच उल्लेख होता. अनेक वर्षांनंतर अखेर या शब्दात बदल करण्यात आला आहे.
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येनंतर मराठी विश्वकोशाच्या डिजिटल आवृत्तीमध्ये गांधी हत्या नाही तर गांधी वध असा शब्दउल्लेख होता. प्रभाकर कोंडबत्तुनवार यांनी चार वर्षांपासून यात सुधारणा करण्याची मागणी केली होती. अखेर यात बदल करण्यात आला असून ‘गांधी वध’ नाही तर ‘गांधी हत्या’ असा शब्दबदल करण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य विश्वकोश मंडळाने विश्वकोशाच्या डिजिटल आवृत्तीमध्ये अनेक वर्षांपासून गांधी वध असा शब्द उल्लेख होता. याला अनेकांचा विरोध होता. त्यामुळे त्यात बदल करावा अशी मागणी केली जात होती. मराठी विश्वकोशाच्या मुद्रित खंड १४ मधील पृष्ठ क्रमांक ६७६ मध्ये लेखक शं.ना. नलगुंदकर यांचा भारतीय जनता पक्ष यावरील लेख आहे.
त्यात ‘‘१९४८ मध्ये महात्मा गांधींच्या वधानंतर सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुमहासभा या दोन्ही संघटनांवर बंदी घातली. पुढील वर्षी ती उठविली.’’ असा उल्लेख आहे. डिजीटल आवृत्तीमध्ये यात बदल करून ‘‘१९४८ मध्ये महात्मा गांधींच्या ‘खुनानंतर’ सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ व हिंदुमहासभा या दोन्ही संघटनांवर बंदी घातली. पुढील वर्षी ती उठविली.’’ असा शब्दबदल केला आहे.
असा आहे नवीन बदल
लेखक वसंत नगरकर यांच्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या लेखामध्ये ‘‘गांधीवधाने संघावर फार मोठा आघात झाला. नथुराम गोडसे एकेकाळी संघात होते. ते महाराष्ट्रीय ब्राह्मण होते आणि बहुतेक सर्व संघनेतेही महाराष्ट्रीय ब्राह्मण असल्यामुळे गांधीवधाबद्दल संघाला दूषण देण्यात आले.’’ असा उल्लेख होता. डिजीटल आवृत्तीमध्ये सुधारणा करून ‘‘महात्मा गांधीजींच्या ‘खुनाने’ संघावर फार मोठा आघात झाला. नथुराम गोडसे हा माणूस संघात होता. तो महाराष्ट्रीय ब्राह्मण होता. बहुतेक सर्व संघनेतेही महाराष्ट्रीय ब्राह्मण असल्यामुळे महात्मा गांधीजींच्या खुनाबद्दल संघाला दूषण देण्यात आले,’’ असा बदल करण्यात आलेला आहे.