गडचिरोली :  मागील पाच वर्षात गडचिरोलीतील नक्षलवाद मोठ्या प्रमाणात आटोक्यात आला असला तरी उत्तर गडचिरोलीतील अतिसंवेदनशील कोरची येथे नक्षल सप्ताह दरम्यान बंद पाळण्यात येत होता. मात्र, दोन दशकानंतर यावेळी पहिल्यांदाच पोलीस आणि नागरिकांच्या पुढाकाराने नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी बाजारपेठ खुली ठेऊन नक्षल्यांची दहशत जुगारण्यात आली. मृत नक्षलवाद्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी नक्षली २८ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान सप्ताह पाळतात.

४ जून २००६ साली कोरचीतील प्रतिष्ठित व्यापारी डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची नक्षलवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.या घटनेमुळे नक्षल सप्ताहात येथील व्यापारपेठ भीतीपोटी बंद ठेवली जात असे. अखेर २८ जुलै रोजी रोजी तब्बल २० वर्षांनंतर पोलिसांच्या पुढाकाराने २० वर्षांपासूनच्या नक्षलवाद्यांच्या दहशतीला न जुमानता व्यापाऱ्यांनी दुकाने सुरु ठेवली.

सुरक्षा यंत्रणांविरुध्द कारवाया करण्यासाठी नक्षली टीसीओसी( टॅक्टिकल काउंटर ऑफेन्सिव्ह कॅम्पेन) सप्ताहाचे आयोजन करतात. यंत्रणांना आव्हान देण्यासाठी कारवाया करणे अशी या सप्हामागची रणनीती असते. जिल्ह्याच्या उत्तर दिशेवरील छत्तीसगड सीमेलगतच्या कोरची या आदिवासीबहुल तालुक्यात दरवर्षी नक्षल सप्ताहात दहशतीचे वातावरण असे. यंदा मात्र २० वर्षांपासूनची दहशत मोडित काढण्यासाठी पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी पुढाकार घेतला.

पोलीस निरीक्षक शैलेंद्र ठाकरे यांनी नक्षल सप्ताहाच्या तीन दिवसांपूर्वी शहरातील व्यापाऱ्यांची सभा घेतली होती .यात नक्षल सप्ताहात दुकाने व व्यापारपेठ सुरळीत सुुरु ठेवावी,असे आवाहन करण्यात आले होते. पोलिसांच्या पुढाकाराने २८ रोजी सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नक्षल्यांची दहशत जुगारत व्यापाऱ्यांनी उद्योग, व्यवसाय सुरळीत सुरु ठेवले.

अग्रवाल यांच्या हत्येने दहशत

४ जून २००६ मध्ये कोरची शहरातील प्रतिष्ठित व्यापारी डॉ. प्यारेलाल अग्रवाल यांची दुकानात असताना दुपारी चार वाजेच्या सुमाराम नक्षल्यांनी बंदुकीने गोळ्या झाडून हत्या केली होती. त्यानंतर २०१९ मध्ये कोरची शहरालगतच्या पकनापट्टी गावाजवळ रस्त्यालगत नक्षल्यानी लावलेल्या बॅनरखाली भुसुरुंग स्फोट घडविला होता. बॅनर काढण्यास गेलेले कोरचीचे सहायक निरीक्षक अतुल तवाडे आणि एक हवालदार झालेल्या स्फोटात गंभीर जखमी झाले होते . यानंतर २०२३ मध्ये अतिदुर्गम नवेझरी गावातील एका व्यक्तीला पोलिसांच्या खबरी असल्याच्या संशयावरून नक्षल्यानी रात्री हत्या केली होती. त्यामुळे नक्षल्यांच्या सप्ताहात व्यापारी दुकाने बंद ठेवत असत.

त्यामुळे नक्षल सप्ताह आलं की व्यापारी व ग्रामीण भागातील नागरिक भीतीमुळे नक्षल सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी व्यापार व कामे बंद ठेवून नक्षल सप्ताह पाडत होते. त्यावेळी कोरची तालुक्यातील दुर्गम भागातील नागरिक कुठल्याही कामाने कोरची शहरात आले तर हॉटेल व दुकाने बंद असल्यामुळे पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नव्हते एवढ कडकडीत कोरची बंद राहत होते.

मागील वर्षीपासून नक्षल चळवळीतील प्रमुख जहाल नेते चकमकीत ठार झाले , अनेक नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण सुद्धा केले. गडचिरोली पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानाला यश मिळत आहे. त्यामुळे सध्या नक्षलवादी बॅकफूटवर आहेत.उत्तर गडचिरोली नक्षलमुक्त झाल्याची घोषणा पोलिसांनी यापूर्वीच केलेली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

कोरची येथील व्यापारी व नागरिकांनी दहशत झुगारत नवी सुरुवात केली आहे. त्यांना भयमुक्त वातावरण मिळावे यासाठी सुरक्षा जवान सतर्क आहेत. सीमावर्ती भागात अद्याप कोठेही नक्षल्यांचे पत्रक अथवा बॅनर, पोस्टर आढळलेले नाही. जिल्ह्यात अलर्ट जारी केला असून सीमावर्ती भागात नक्षलविरोधी अभियान गतिमान केले आहे.- नीलोत्पल, पोलीस अधीक्षक, गडचिरोली