नागपूर : वैद्यकीय शिक्षण खात्याच्या अखत्यारित असलेल्या नागपुरातील चार शासकीय वैद्यकीय संस्थांना लवकरच सुमारे ७०० चतुर्थश्रेणी कर्मचारी मिळणार आहेत. त्यासाठी जिल्हा निवड समितीला चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या परीक्षांसह नियुक्तीबाबतची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी एक संस्था नियुक्त करायची आहे. नागपुरात मेडिकल, मेयो, शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, शासकीय आयुर्वेद महाविद्यालय व रुग्णालय अशा चार संस्था आहेत. येथे ७०० हून अधिक चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. कर्मचारी नसल्याने रुग्णांना त्रास होतो.
हा त्रास कमी करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण खात्याने जिल्हा निवड समितीला आयबीपीएस आणि टीसीएसपैकी एक कंपनी निवडण्याची सूचना केली आहे. ही कंपनी स्थायी चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीसाठी प्रक्रिया करेल. जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी तर चारही वैद्यकीय संस्थेच्या अधिष्ठातांसह विविध शासकीय विभागातील वरिष्ठ अधिकारी असे जवळपास १३ सदस्य आहेत. ही प्रक्रिया लवकर करण्याची सूचना असल्याने लवकरच चतुर्थश्रेणी कर्मचारी मिळतील. त्यामुळे भविष्यात नातेवाईकांना रुग्णांचे स्ट्रेचर ओढणे, इतरत्र हलवण्यासाठीचा त्रास कमी होईल.