लोकसत्ता टीम

नागपूर : राजस्थानातच अडखळलेल्या मान्सूनने उशिरा का होईना, पण महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू केला. तरीही ‘ऑक्टोबर हिट’चे चटके मात्र वाढतच चालले आहेत. राज्यातील आणि विशेषकरून विदर्भातील अनेक शहरांमधील तापमानाचा पारा वाढतच आहे. रविवारी राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद अकोला येथे ३६.८ अंश सेल्सिअस तर ब्रम्हपुरी येथे ३६.७ अंश सेल्सिअस इतकी करण्यात आली.

एकीकडे राज्यातील ‘ऑक्टोबर हिट’ चांगलाच तापदायक ठरत आहे. पहाटेच्या सुमारास गार वाऱ्यांची झुळूक तर सूर्यनारायणाने डोके वर काढताच उन्हाचे चटके, अशीच सर्वत्र स्थिती आहे. तर हवामान खात्याकडून आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. आज, सोमवारी राज्याच्या दक्षिणेकडील भागाला पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. मान्सूनने शनिवारपासून राज्यातून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. येत्या दोन-तीन दिवसात महाराष्ट्राच्या आणखी काही भागातून तो परतेल. याठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. उर्वरीत महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिल्याने मात्र ‘ऑक्टोबर हिट’ कायम असणार आहे. त्यामुळे आणखी काही दिवस नागरिकांना उन्हाचे चटके आणि उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरात तमिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

आणखी वाचा-निवडणुकीच्या निमित्ताने मराठीचा भाग्योदय, विकास मंडळांचा कधी?

राज्यात पावसाने उघडीप दिल्याने उन्हाचा चटका आणि उकाडा तापदायक ठरत आहे. विदर्भातील अकोला शहरात रविवारी ३६.८ अंश सेल्सिअस तर ब्रम्हपुरी येथे ३६.७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. विदर्भातील उर्वरित जिल्ह्यात देखील तापमान ३४ अंशाच्या वर तर काही ठिकाणी ते ३५ अंशाच्या वर आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आज सोमवारी राज्याच्या दक्षिण भागातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. अधिकृतरित्या राज्यातून मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरू झाला आहे. पण, बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे राज्यात येत असल्यामुळे नऊ ते बारा ऑक्टोबरदरम्यान राज्यात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात सध्या होणारी वातावरणनिर्मिती पाहता हवेच्या वरच्या स्थरात उष्ण आणि कोरडे उष्ण वारे बाष्पयुक्त वाऱ्यांमध्ये मिसळल्यामुळे ढगांच्या गडगडाटासह पावसाची हजेरी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.