नागपूर:- मागील ३ महिन्यापासून झांसी राणी चौक मेट्रो स्टेशन ते लोकमान्य नगर मेट्रो स्टेशन दरम्यान सायकल चोरीच्या अनेक घटना घडल्या.स्टेशन परिसरात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये एकच व्यक्ती या सर्व घटनांमध्ये सहभागी असल्याचे निदर्शनास आले. चोराला पकडण्याकरिता महामेट्रोच्यावतीने मोहीम राबविण्यात आली. १३ मे रोजी सदर व्यक्ती पुनः एकदा ऍक्वा लाईन मार्गिकेवरील बंसी नगर मेट्रो स्टेशनवर रचना रिंग रोड मेट्रो स्टेशन कडे जाणाऱ्या मेट्रोमध्ये बसताना निदर्शनास आला. बंसीनगर मेट्रो स्टेशन येथे कार्यरत सुरक्षा रक्षक अक्षय तागडे यांनी रचना रिंग रोड मेट्रो स्टेशन येथे कार्यरत स्टेशन कंट्रोलर अभिजित ठोकल,सुरक्षा रक्षक आणि स्टेशन परिसरातील कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. सदर व्यक्तीला रचना रिंग रोड मेट्रो स्टेशन येथे ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान त्याने सायकल चोरी केल्याची कबुली दिली. या व्यक्तीचे नाव भगवानदास करिया असल्याचे सांगितले.

पुढील कार्यवाही करिता आरोपीला एमआयडीसी पोलीस स्टेशनकडे सोपवण्यात आले. त्याच्या विरुद्ध कलम ५११ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला व चोरीला गेलेल्या सायकल जप्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेट्रो कर्मचाऱ्याच्या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. यापूर्वीही महामेट्रोच्या कर्मचाऱ्यांनी प्रवाशांच्या चोरीस गेलेल्या किंवा हरवलेल्या वस्तू परत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले आहेत. सर्वच स्थानकांवर सीसीटीव्ही  लावण्यात आल्याने तेथील प्रत्येक घडामोडी या कॅमेऱ्यात कैद होतात. यामुळे असामाजिक घटकांना आवर घालण्यात यश येते.

हेही वाचा >>>बियाणे उत्पादनात घट? शेतकरी चिंतेत, मागणी अधिक पुरवठा कमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मेट्रोच्या सर्वच स्थानकावर शाळेच्या मुलांची गर्दी वाढली आहे. अनेक मुले ही स्थानकावर सायकील ठेवून पुढच्या प्रवासाला निघतात तर काही जण प्रवास करताना मेट्रोतूनच सायकल सोबत नेतात. स्थानकाबाहेर ठेवलेल्या सायकली चोरीच्या घटना यापूर्वीही घडल्या होत्या. तसेच काही स्थानकावरून दुचाकीही चोरीस गेल्या आहेत. काहींचा तपास लागला तर काहीचा तपास लागलेला नाही. महामेट्रोने सुरक्षेच्या अनुषंगाने अनेक उपाययोजना केल्या आहेत. मेट्रोगाडीतही सीसीटीव्ही लावण्यात आले आहेत. स्टेशनच्या आत आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहे. मेट्रोमध्ये दैनंदिन प्रवाशांची संख्याही वाढू लागली आहे. उन्हाळा असल्याने प्रवाशांच्या संख्येत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मेट्रो व्यवस्थापन अधिक सतर्क झाले आहे. सायकल चोरांना मेट्रोच्या सुरक्षा रक्षकांनी अटक केल्याने अशा घटनाना आळा बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे