scorecardresearch

लिपिकाने चुकून एक शून्य टाकला अन् सरकारकडून ३.५ चे ३५ कोटी मंजूर, नागपूरच्या मेयो रुग्णालयात नेमकं काय घडलं? वाचा…

नागपूरमधील मेयो रुग्णालयातील लिपिकाकडून कागदावर एका शून्याची चूक झाली आणि सरकारने ३.५ कोटी ऐवजी थेट ३५ कोटी रुपये मंजूर केल्याची घटना समोर आलीय.

सरकारी व्यवहार आणि हिशोब म्हटलं की अगदी रुपया-रुपयांचा व्यवहार कागदावर होतो. प्रत्येक गोष्टीचा हिशोब कागदावरच होतो. मात्र, नागपूरमधील मेयो रुग्णालयातील लिपिकाकडून कागदावर एका शून्याची चूक झाली आणि सरकारने ३.५ कोटी ऐवजी थेट ३५ कोटी रुपये मंजूर केल्याची घटना समोर आलीय. इतकंच नाही, तर हप्त्याने येणाऱ्या या निधीपैकी शासनाने जवळपास १० कोटी रुपये मेयो रुग्णालयाला दिलेही. त्यानंतर ही बाब रुग्णालय प्रशासनाच्या लक्षात आली.

नेमकं काय घडलं?

मेयो रुग्णालयात कंत्राटी कामगारांच्या पगारासाठी ३.५ कोटी रुपयांची गरज होती. मात्र, यासाठी निधीची मागणी करताना लिपिकाने संगणकावर एन्ट्री करताना चुकून एक अधिकचा शून्य टाईप झाला. शासनाने देखील या शून्यासह ३.५ ऐवजी ३५ कोटी रुपयांची मागणी गृहीत थरून मेयो रुग्णालयाला थेट ३५ कोटी रुपये मंजूर केले. ही रक्कम हप्त्या हप्त्याने मेयो रुग्णालयाला मिळत होती.

आतापर्यंत ३५ पैकी १० कोटी रुपये मेयो रुग्णालयाला प्राप्त झाले. यानंतर ही गोष्ट रुग्णालय कर्मचाऱ्यांच्या लक्षात आली. त्यामुळे मेयो रुग्णालय प्रशासनाने तात्काळ याबाबत परिपत्रक काढून आवश्यकतेपेक्षा अधिकचे पैसे सरकारला परत केले आहेत.

दरम्यान, मेयो रुग्णालयातील या एका शून्याच्या करामतीची सध्या जोरदार चर्चा होत आहे. सरकारी खात्यांमध्ये कागदपत्रांशिवाय आणि अनेकदा तपासल्याशिवाय कोणतंही काम होत नाही. मात्र, मेयो रुग्णालयात लिपिकाने एक शून्य अधिकचा लिहूनही वरिष्ठ पातळीवर ही गोष्ट लक्षात आली नाही.

हेही वाचा : नागपुरात अधिवेशन न झाल्याने जिल्ह्याला ३०० कोटींचा तोटा, व्यापाऱ्यांची जाहीर नाराजी

इतकंच नाही, तर वाढीव निधीला मंजूरी देण्यात आली. तसेच प्रत्यक्षात ३.५ कोटी रुपयांची आवश्यकता असताना १० कोटी मेयो रुग्णालयाच्या खात्यावर पाठवण्यातही आले. त्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये या एका शून्याच्या करामतीची चर्चा रंगली आहे.

मराठीतील सर्व नागपूर ( Nagpur ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Meyo hospital staff mistakenly type one extra zero while demanding fund in nagpur pbs

ताज्या बातम्या