नागपूर : खनिज संपत्तीसाठी राज्यात अनेक ठिकाणी खाणी तयार करण्यात आल्या आहेत. या खाणीत काम करणारे कामगार दररोज स्वत:चा जीव धोक्यात घालूनच काम करत असतात. सुरक्षेत थोडीही गडबड झाली तरीही जीव गमवावा लागतो. अशा अनेक घटना घडल्या देखील आहेत. विदर्भात अलीकडेच खाणीतील कामगारांचा स्वत:चा जीव गमवावा लागला आहे. सर्वसामान्यांना या खाणींविषयी माहिती व्हावी म्हणून आता सर्वसामान्य नागरिकांना या खाणीचा थरार अनुभवता येणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, मुंबईचे व्यवस्थापकीय संचालक व भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या संकल्पनेतून पर्यटकांना रोमांचकारी अनुभव देण्याकरिता ‘खाण पर्यटन सहल’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. आठवड्याच्या प्रत्येक शनिवारी ही सहल आयोजित करण्‍यात येणार असून यात कमीत कमी पाच तर जास्तीत जास्त १५ लोकांना सहभागी होता येईल. नागपूर शहराच्‍या जवळ कोलार नदीच्‍या काळावर खनिज संपत्‍तीने परिपूर्ण असलेल्‍या सावनेर तालुक्‍यातील वेकोलीच्‍या अंतर्गत असलेल्‍या जमिनीच्‍या खाली सुमारे दोनशे ते तीनशे मीटर खोल खाणींच्‍या आतील विश्‍व बघण्‍याचा थरारक अनुभव देणारी ही रोमांचकारी सहल राहणार आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडने विकसीत केलेल्‍या कोळसा खाण परिसरातील इको पार्कमधील विविध झुले, सी शॉवर, ट्री हाऊस मचान, टॉय ट्रेन, फॉऊंटन वेटसह, मॉडेल माईन वर्कीग मशीन, सोलर सिस्टीम इत्यादींचा आनंद घेता येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या खाण पर्यटन सहलीत सहभागी होण्‍यासाठी पर्यटकांचे वय १८ वर्ष पुर्ण असणे आवश्‍यक आहे. महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ सिव्हिल लाईन्स, कार्यालय, नागपूर ते सावनेर कोळसा खाण ते परत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, सिव्हिल लाईन्स, कार्यालय असा सहलीचा मार्ग राहणार असून एसी वाहन सुविधा राहील. प्रथम येणाऱ्या पर्यटकांना प्राधान्य दिल्या जाईल. सदर सहलीच्या माहितीकरिता व बुकींगकरिता सुनिल येताळकर, अधिकारी, भ्रमणध्वनी क्रमांक ९०२१५१५५१९, आशिष दखणे भ्रमणध्वनी क्रमांक, ९०९६०११८५० व वैशाली भांडारकर भ्रमणध्वनी क्रमांक ९५०३९६६८७७ यांच्याशी पर्यटकांनी संपर्क करावा व या संधीचा लाभ घ्‍यावा, असे आवाहन दिनेश आ. कांबळे, वरिष्ठ प्रादेशिक व्यवस्थापक, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, प्रादेशिक कार्यालय नागपूर, अमरावती यांनी केले आहे.