वर्धा, राज्यात लाडकी बहिण योजना लागू झाली आणि लाडका, लाडकी शब्दाचा भाव चांगलाच वधारला. कोण कोणाचा लाडका, याची गमतीदार चर्चा झडू लागली. आजही तसेच घडले. राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार हे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्यास देवळी येथे पोहचले.

देवळी म्हणजे माजी खासदार रामदास तडस यांचा गढ. त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भव्य कार्यक्रम झाला. आज कॅबिनेट असूनही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या परवानगीने ईथे आलो व त्यांच्या शुभेच्छा पण तडस यांना द्यायच्या होत्या. हा दौरा गृह राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या पुढाकारातून झालं आहे. डॉ भोयर हे तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे लाडके मंत्री आहेत, असे वक्तव्य शेलार यांनी करताच टाळ्यांचा चांगलाच गजर झाला. त्यात व्यासपीठावरील सगळ्यांचेच चेहरे हास्याने फुलले.

लाडके मंत्री कोण याचा उलगडा झाल्याची खुसखुशीत चर्चा झाली. दिवसभर राज्यमंत्री डॉ. भोयर यांच्या सोबत राहलेले शेलार यांच्याकडे काय साखरपेरणी झाली, याचे औत्सुक्य सगळ्यांना लागले. राज्यभर प्रत्येक विधानसभा मतदारसंघात असे दर्जेदार नाट्यगृह उभारण्याचे धोरण त्यांनी जाहीर केले. सोबतच विदर्भ केसरी नव्हे तर विदर्भ विकास केसरी असा गौरव शेलार यांनी तडस यांचा केला.

याप्रसंगी आमदार राजेश बकाने, दादाराव केचे, समीर कुणावार, चंदू यावलकर तसेच भाजप जिल्हाध्यक्ष सुनील गफाट, शोभा तडस, जिल्हाधिकारी वान्मथी सी.,वैशाली येरावार प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आपल्या भाषणातून म्हणाले की नाट्यगृह उभे करतांनाच त्याच्या देखभालीची पण तरतूद करण्याची दृष्टी रामदास तडस यांनी करून ठेवली. हे तेच करू शकतात. अधिकृत खासदार कोणीही असो, पण मनातले खासदार तडस हेच आहेत, असे मत व्यक्त करताच नाट्यगृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.

आमदार राजेश बकाने यांनी सेवाग्राम येथे सांस्कृतिक व पत्रकार भवन स्थापन करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. रामदास तडस यांनी आपल्या भाषणातून कृतज्ञता व्यक्त करीत आपली सर्व पेन्शन ही खेळाडू प्रशिक्षण यावर खर्च होत असल्याचे नमूद करीत गत ४० वर्षांपासून देवळीकर पालिका सत्ता आपल्याकडे सोपवीत विश्वास व्यक्त करीत असल्याचे नमूद केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत प्रदीप दाते, संजय इंगळे तिगावकर, संदीप चिचाटे, शशिकांत बाघडदे तसेच प्रीती वाडिभस्मे, मुख्याधिकारी विजय कुमार, पराते फर्म, ज्योतवानी यांचा सत्कार करण्यात आला. ज्योती भगत व शुभांगी कुरजेकर यांनी सूत्र सांभाळले. आयोजनात रवी करोटकर, सौरभ कडू, उमेश कामडी, आकाश वऱ्हाडे, संदीप पिंपळकर, शरद आदमने, छाया तडस, ज्योती खाडे, मंगला रोकडे, रमेश सातपुते आदिनी योगदान दिले.